Pimpri : अनधिकृत बांधकामे करणा-या 251 जणांवर गुन्हे ; 5348 जणांना नोटीस

1054 अनधिकृत बांधकामे भुईसपाट

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व नियंत्रण विभागाने सन 2018 या वर्षाच्या 11 महिन्यात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी 251 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. तर, 1054 अनधिकृत बांधकामे भुईसपाट केली असून 5348 जणांना नोटीसा धाडल्या आहेत. दरम्यान, महापालिकेने वाकड पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.27)अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामाचा मुद्दा राज्यभर गाजला होता. त्यावरुन मोठ्या प्रमाणात राजकारण तापले होते. लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुका या प्रश्नांवरच लढविल्या गेल्या. शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा शब्द भाजपने शहरातील जनतेला दिला होता. भाजपच्या आश्वासनाला शहरवासियांनी साथ दिली. महापालिकेत एकहाती सत्ता भाजपकडे सोपविली. परंतु, राज्यातील सरकराला चार वर्ष पुर्ण होत आली. तरी, देखील शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित झाली नाहीत. त्यामुळे शहरवासियांवार कारवाईची टांगती तलवार कायम आहे. सरकारने अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, न्यायालयात तो टिकला नाही.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने अनधिकृत बांधकामावरील कारवाई वेगात सुरु केली आहे. वर्षभरात अनधिकृत बांधकामे केल्याप्रकरणी तब्बल 251 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर, महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 या कायद्यानुसार अनधिकृत बांधकामे काढून टाकण्यासंदर्भात कलम (53) नुसार जानेवारी ते नोव्हेंबर 2018 अखेरपर्यंत तीन हजार 707 जणांना नोटीस दिल्या आहेत.

महाराष्ट्र महापालिका अधिनियम या कायद्याअंतर्गत महापालिका आयुक्तांच्या लेखी परवानगीशिवाय केलेले बांधकाम काढण्यासंदर्भात एक हजार 641 जणांना बांधकाम पाडण्याबाबत नोटीसा दिल्या आहेत. तसेच या नोटीसीनुसार बांधकाम पाडण्याचा खर्च देखील संबंधितांकडून वसूल केला जातो. त्याचबरोब महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने   जानेवारी ते नोव्हेंबर 2018 या 11 महिन्यात एक हजार 54 अनधिकृत बांधकामे भुईसपाट केली आहे. त्याचे क्षेत्रफळ 76 हजार 813 चौरस मीटर आहे.

अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.27)तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत. महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम 397 (अ) (1) (ब) नुसार गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी महापालिकेचे उपअभियंता आबासाहेब कृष्णाजी ढवळे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुणवंत भगवान दळवी रा. शिवकॉलनी, थेरगाव, बबन दादा नाळे रा. थेरगाव आणि गोविंद बळीराज चौधरी (रा. साईनाथ कॉलनी, डांगे चौक, थेरगाव)यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांनीही अनधिकृत बांधकाम केले असून त्यांना महापालिकेमार्फत नोटीस देण्यात आली होती. तरीदेखील त्यांनी 26 डिसेंबर 2018 पर्यंत अनधिकृत बांधकाम काढले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.