Pimpri : औद्योगिक नगरीला घरफोडीचे ग्रहण!; एकाच दिवसात आठ घरफोड्या करून 45 लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणा-या पिंपरी-चिंचवड शहरात एकाच दिवसात आठ घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 45 लाख 58 हजार 60 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. हा आकडा केवळ दाखल केलेल्या गुन्ह्यांचा आहे. प्रत्यक्षात परिस्थिती यापेक्षा भयानक असण्याची शक्यता आहे. सर्व गुन्ह्यातील आरोपी अज्ञात आहेत. पोलिसांच्या हाती अद्यापपर्यंत काहीही लागले नसून यामध्ये एटीएम फोडणे, दानपेटी चोरण्याचे देखील गुन्हे घडले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात औद्योगिक वसाहतींसह नागरीवस्ती देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातच टोळक्यांचा राडा, गर्दी, मारामारी, शस्त्राचा धाक दाखवून लुटणे, चोरी, घरफोडी असे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणि नागरिकांमध्ये कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु करण्यात आले. शहरासाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु होऊन देखील गुन्हेगारांवर पाहिजे तेवढा वचक निर्माण करण्यात पोलीस प्रशासन कमी पडले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात येणा-या सर्व पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. 16) एकूण आठ घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

  • निगडी पोलीस ठाण्यात घरफोडीचे दोन गुन्हे दाखल आहेत. संभाजीनगर चिंचवड येथील साई गार्डनमध्ये असलेल्या साईबाबा मंदिरातील अज्ञात चोरट्यांनी दानपेटी चोरून नेली. दानपेटी मध्ये असलेले 20 हजार रुपये दानपेटीचे कुलूप तोडून चोरून नेले. मोहननगर चिंचवड येथे एएसआय हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या मेडिकल दुकानाच्या शटरचा कडी-कोयंडा उचकटून दुकानातून लॅपटॉप आणि रोख रक्कम असा एकूण 39 हजार 560 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

पुणे-नाशिक रोडवर धावडेवस्ती येथे सोनाली बिर्याणी हाऊस व बारच्या शेजारी स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम सेंटर आहे. त्यामध्ये दोन एटीएम मशीन आहेत. शुक्रवारी (दि. 15) रात्री अकरा ते शनिवारी (दि. 16) सकाळी सव्वाअकरा च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी एटीएम मशीनचा कॅश व्हॉल्ट हा भाग गॅस कटरने कापून एटीएम फोडले. एका मशीनमधून 20 लाख 18 हजार 400 तर दुसऱ्या मशीनमधून 15 लाख 7 हजार 700 असा एकूण 35 लाख 26 हजार 100 रुपयांची रोकड चोरून नेली.

  • चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत खराबवाडी येथील सोमवंशी इंडस्ट्रियल इस्टेटमधील बालाजी इंटरप्रायजेस या वर्कशॉपचे कुलूप उघडून वर्कशॉपमधून बॉशप्लेट आणि टॉपप्लेट असा एकूण 2 लाख 47 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

शिवदर्शन कॉलनी मोहननगर येथे एक घरफोडी झाली. त्याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागच्या दाराची कडी उघडून घरात प्रवेश केला. घरातील टीव्ही, एलसीडी, होम थिएटर, मोबाईल फोन, मंगळसूत्र, आणि दोन मनगटी घड्याळे असा एकूण 42 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. मधुकर विठ्ठल मोरे (वय 42, रा. शिवदर्शन कॉलनी, मोहननगर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

  • मावळ तालुक्यातील धामणे येथे असलेल्या किर्लोस्कर इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स मॅनेजमेंट स्टिडीज कॉलेजच्या विद्यार्थी वसतिगृहातून अज्ञात चोरट्याने 20 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला. याप्रकरणी अमेया सुनील वर्मा (वय 23) या विद्यार्थिनीने तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राजाराम नगर किवळे येथे एका बंद घराचे कुलुप तोडून घरातून एक तोळ्याची सोन्याची चेन, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी आणि दहा हजार रुपये रोख चोरून नेले.

  • बावधन खुर्द येथील लॅच लॉक लावून बंद असलेला फ्लॅट अज्ञात इसमाने फोडला. फ्लॅटमधून सोन्याचे, हि-याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 6 लाख 52 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश पाटील म्हणाले, “नागरिकांनी घराला सेफ्टी डोअर, लॅच लॉक लावायला हवे. योग्य त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. शक्यतो कॅमेरे वायरलेस असावेत, जरी वायर असेल तरी ती अंडरग्राउंड असावी. ज्यामुळे चोरट्यांना वायर कापता येणार नाही. सीसीटीव्हीच्या डीव्हीआरची योग्य ती काळजी घ्यावी. सोसायटीमधील सुरक्षारक्षक जागरूक आहेत का? याची तपासणी करावी. सुरक्षारक्षकांचे पोलीस व्हेरिफिकेशन करावे. घरगुती आणि व्यावसायिक सुरक्षेसाठी सायरन इक्विपमेंट मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. त्याचा वापर करावा. घर, सोसायटी आणि परिसरात संशयित व्यक्ती, वाहन दिसल्यास त्याबाबतची माहिती पोलिसांनी द्यावी. घरफोडी आणि अन्य सर्व गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.