Pune : प्रियकरासोबत पळून गेलेली विवाहिता पोलिसांच्या समुपदेशनानंतर पतीसोबत नांदण्यास राजी

एमपीसी न्यूज – पती वारंवार संशय घेत असल्यामुळे होणाऱ्या भांडणाला कंटाळून पुण्यातील गंज पेठ परिसरातील एक तरुण मुस्लिम विवाहित महिला आपल्या अडीच वर्षीय मुलाला घेऊन प्रियकरासोबत पळून गेल्याचा प्रकार घडला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने या महिलेचा शोध घेतला आणि समजूत काढून परत पतीच्या घरी पाठविले.

ही विवाहिता 9 मार्च रोजी नाना पेठेत काही कामानिमित्त गेली होती, ती परत आलीच नाही. त्यानंतर पतीने समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. सहायक पोलिस निरीक्षक परवेज शिकलगार यांनी मिसिंग तरुणीच्या आई-वडिलांकडे विचारपूस केली असता तीन वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाल्याची समजले. दोघा नवरा बायकोत संशयावरून सतत भांडण होत असल्याचे समजले.

  • मिसिंग तरुणीचे लग्न होण्यापूर्वी एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या तरुणाचा शोध घेतला असता ही विवाहिता मुलासह त्याच्या घरी आढळली. या महिलेने पतीच्या घरी जाण्यास स्पष्ट नकार दिला आणि उर्वरित आयुष्य प्रियकरासोबत घालवणार असल्याचे पोलिसांना स्पष्ट सांगितले.

त्यानंतर महिला दक्षता समितीच्या सदस्यांनी आणि महिला पोलिसांनी समजूत काढून आयुष्यातील जुन्या घटना विसरून जाण्यास सांगितले. त्यानंतर ही महिला पतीसोबत राहण्यास तयार झाली. पोलिसांनी तिच्या पूर्वाश्रमीच्या प्रियकरालाही या महिलेच्या आयुष्यात ढवळाढवळ न करण्याची सक्त ताकीद दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.