Pimpri : फरशीचा तुकडा डोक्यात मारून नातीने लुटले आजीला

एमपीसी न्यूज – फरशीच्या तुकड्याने तोंडावर व डोक्यात मारून आजीला गंभीर जखमी केले आणि त्यानंतर तिच्या अंगावरील अडीच तोळ्यांच्या दोन सोन्याच्या बांगड्या, एक सोन्याची चेन व कानातील सोन्याच्या रिंगा जबरदस्तीने चोरून नेल्या. हा प्रकार कोणी ति-हाईताने केला नसून जखमी आजीच्या नातीनेच केला आहे. ही घटना गुरुवारी (दि. 2) सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास संत बाबा मुलसिंग दरबार, शनी मंदिराजवळ, पिंपरी येथे घडली.

रेश्मा विकास रोकडे (वय 27, रा. काळेवाडी) असे आरोपी तरुणीचे नाव असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. याप्रकरणी कनवार सुंदरदास ठाकूराणी (वय 41, रा. संत बाबा मुलसिंग दरबार, शनीमंदिर जवळ, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कनवर यांच्या आई अमृताबाई सुंदर दास ठाकूराणी (वय 85) या घरात  एकट्या होत्या. त्यावेळी कनवर यांच्या भावाची मुलगी रेश्मा देखील घरी होती. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास आरोपी रेश्मा हिने फरशीच्या तुकड्याने आजी अमृताबाई यांच्या तोंडावर व डोक्यात मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर आजीच्या अंगावरील सोन्याच्या दोन बांगड्या, एक सोन्याची चेन, कानातील सोन्याच्या रिंगा असा एकूण 55 हजार रुपये किमतीचा अडीच तोळ्यांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.