Pimpri: ‘होम आयसोलेशन’ रुग्णांची ‘स्वास्थ्य’ कॉल सेंटरद्वारे होणार विचारपूस

Home Isolation' patients will be interviewed through 'Swastha' call center ; त्रास होत असल्यास 'या' नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारच्या निर्देशानुसार कोविड पॉझिटीव्ह पण कोणतीही लक्षणे नसलेल्या तसेच घरी स्वतंत्र शौचालय, अलगीकरणाची व्यवस्था असलेल्या रुग्णांना ‘होम आयसोलेशन’ केले जाते. होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या सोईसाठी पालिकेने स्वॉस्थ कॉल सेंटर यंत्रणा सुरु केली आहे. या माध्यमातून रुग्णांची विचारपूस केली जाणार आहे.

तसेच आयसोलेशनमधील रुग्णांना त्रास होत असल्यास 020-67331140, 020-67331143 वर संपर्क साधण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

स्वॉस्थ कॉल सेंटर यंत्रणेचे महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते आज (सोमवारी) उदघाटन करण्यात आले. कॉल सेंटर मधील यंत्रणेतून महापौर यांनी स्वत: कोरोनाबाधित रुग्णासोबत फोनद्वारे थेट संवाद साधला. रुग्णाच्या तब्येतीची विचारपूस केली.

उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त श्रावण हर्डीकर, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, उपायुक्त सुभाष इंगळे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे उपस्थित होते.

वॉर रुममध्ये तयार केलेल्या या कॉल सेंटरमधून पहिल्या दहा दिवसापर्यंत गृह अलगीकरणात (होम आयसोलेशन) मध्ये असणा-या रुग्णांची दिवसातून दोन वेळा फोनद्वारे विचारपूस करण्यात येणार आहे.

त्यादरम्यान लक्षणे आढळलेल्या रुग्णांना नजिकच्या पालिकेच्या रुग्णालयात पाठविण्याबाबत उचित कार्यवाही करण्यात येणार आहे.

कोविड पॉझिटीव्ह असलेल्या व लक्षणे नसलेल्या रुग्णांसाठी हे स्वतंत्र कॉल सेंटर सुरु करण्यात आले असून ते 24 तास सुरु असणार आहे.

गृह अलगीकरणात असणा-या रुग्णांना कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवत असल्यास त्यासाठी स्वॉस्थ्य हेल्पलाईन 020-67331140, 020-67331143 वर संपर्क साधण्याची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

गृह अलगीकरणात असणा-या नागरिकांनी या सुविधेचा वापर करावा, असे आवाहन महापौर माई ढोरे आणि सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.