Pimpri : व्यवसायात सातत्य आणि दर्जा ठेवला तर यश नक्की – नवनाथ येवले

एमपीसी न्यूज – चवीमध्ये तसंच दर्जात आणि तत्पर सेवेत सातत्य ठेवलं तर चांगलं यश मिळू शकतं, असे येवले चहाचे सर्वेसर्वा नवनाथ येवले यांनी निगडी येथे व्यक्त केले .

उद्योजकता स्मार्ट सिटी स्मार्ट स्टार्टअप अंतर्गत निगडी येथील अमित गोरखे युथ फाऊंडेशनच्यावतीने ऑनलाईन व्यवसाया बाबतीत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आयोजक अमित गोरखे, रवी घाटे, ज्येष्ठ पत्रकार विजय भोसले, भाऊसाहेब कोकाटे उपस्थित होते. अमित गोरखे यांच्या हस्ते नवनाथ येवले यांचा सत्कार करण्यात आला.

चहा व्यवसायात कसा उतरलो येवले चहा ब्रॅण्ड कसा झाला याबाबतीत ते म्हणाले, ‘येवले अमृततुल्य’ हा विषय चहाप्रेमींमध्ये सध्या खूप चर्चेचा आहे. ‘येवले चहा, एकदा पिऊन तर पाहा’ असं या अमृततुल्यचं आवाहन आहे. चहा तयार करण्याचा कारखाना आहे असं वाटावं, अशा पद्धतीने येवले अमृततुल्यमध्ये चहा तयार होत असतो. चहा तयार करण्याची इथली पद्धतही हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी आलेले लोक खास थांबून पाहात राहतात.

पुरंदर तालुक्यातील आस्करवाडी येथील हे येवले कुटुंब. या कुटुंबाचा मूळचा व्यवसाय दुधाचा. व्यवसाय फार मोठा नव्हता, तरी थोडं दूध शिल्लक राहत असे. त्यातून चहाच्या हॉटेलची कल्पना दशरथ येवले यांच्या मनात आली आणि त्यांनी भाडय़ाने जागा घेऊन लष्कर भागात चहा विक्रीचा व्यवसाय भागीदारीत सुरू केला. पुढे सॅलिसबरी पार्क भागात ‘गणेश अमृततुल्य’ या नावाने त्यांनी स्वत:चं हॉटेल सुरू केलं. घरातील अन्य मंडळीही हा व्यवसाय पाहात होती आणि तो पाहत असतानाच पुण्यात आपल्या स्वत:च्या नावाचं काही तरी उत्पादन असावं, अशी सर्वाची इच्छा होती. त्यातून नवनवीन कल्पनांवर काम करत चहाच्या हॉटेलची कल्पना पुढे आली. चहाची उत्तम चव कशी तयार होईल याचा या मंडळींनी अभ्यास केला आणि जून २०१७ मध्ये भारती विद्यापीठ येथे येवले अमृततुल्य सुरू झालं. हे हॉटेल सुरू होताच ग्राहकांची येवले चहाच्या चवीला उत्स्फूर्त पसंती मिळाली. येवले कुटुंबातील नवनाथ, गणेश आणि नीलेश हे बंधू, तसंच याच परिवारातील मंगेश आणि तेजस हे बंधू असे मिळून पाच जण आता हा व्यवसाय समर्थपणे सांभाळत आहेत. या सगळ्यांकडे असलेली उद्यमशीलता निश्चितच लक्षणीय आहे. सर्व हॉटेल्सचं व्यवस्थापन सांभाळणं हे अवघड काम. पण सगळे बंधू मिळून सर्व व्याप सांभाळतात.

पहिल्या हॉटेलला मिळालेल्या प्रतिसादानंतर येवले चहाची दुसरी शाखा बुधवार चौकात फरासखान्यासमोर सुरू झाली आणि येवले चहाची प्रसिद्धी मोठय़ा प्रमाणात झाली आणि चर्चाही झाली. चहाप्रेमींना या चहाची चव आवडल्याचे लक्षात आल्यानंतर सदाशिव पेठेत तसेच शिवाजीनगरला शाखा उघडण्यात आल्या. त्यानंतर हत्ती गणपती चौक, पिंपरीतील शगुन चौक इथेही येवले चहा सुरू झाला आणि डेक्कन जिमखाना, मामलेदार कचेरी, कोंढवा, वाघोली इथे लवकरच नव्या शाखा सुरू होत आहेत.

आतापर्यंत 33 व्यवसाय केले. 33 व्यवसायात अपयश आले पण खचुन गेलो नाही. येवले चहा व्यवसायात उतरलो ते पुढील 15 वर्षाच प्लॅनिंग करुनच. चहा हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. पण चहाची चव जशी हवी तशी मिळत नाही. जर आपण चहाला एक दर्जेदार चव दिली. तर चहा प्रेमी नक्कीच येवले अमृततुल्यकडे आकर्षित होतील. याची खात्री होती. या व्यवसायामागचा उद्देश  हा केवळ पैसे मिळवणे हा नसून लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, हा आहे.येवले चहाच्या चवीला मिळालेला प्रतिसाद पाहता सप्टेंबर महिन्याच्या अखेर पर्यंत 40 नव्या शाखा सुरू होणार आहेत. त्यातच येवले चहाची किर्ती परदेशात देखील पोचली असून यूएस, बॅंकाँक आणि दुबई येथे येवले अमृततुल्यच्या शाखा सुरू करण्याची  मागणी होते आहे. परदेशात लवकरच येवले अमृततुल्यची शाखा आपणास दिसून येईल. असा विश्‍वास नवनाथ येवले यांनी व्यक्त् केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित गोरखे यांनी केले. आभार रवी घाटे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.