Pimpri : भारतीय संस्कृती विश्व बदलू शकते- डॉ. संजय उपाध्ये

एमपीसी न्यूज – भारतीय संस्कृती विश्व बदलू शकते, असे प्रतिपादन डॉ. संजय उपाध्ये यांनी केले. गांधी पेठ तालीम मित्रमंडळ आणि मन करा रे प्रसन्न ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मासिक प्रवचन मालिकेंतर्गत ‘सावधान,शत्रू वाढत चालले’ या विषयावरील ५३वे प्रवचनपुष्प गुंफताना चिंचवड येथे शनिवारी (दि.२९) डॉ. संजय उपाध्ये बोलत होते.

प्रवचनात डॉ.उपाध्ये पुढे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत देहाकडून देवाकडे जात असताना वाटेत देश लागतो. त्यामुळे व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र आणि विश्व या संबंधीच्या शत्रूंचा विचार करावा लागतो. व्यक्तिगत पातळीवर काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर या सहा भावनांना षड्रिपू मानले जाते.

वास्तविक शृंगार हा अलंकार आहे; पण त्याला वासनेची जोड मिळाली की ‘काम’ हा रिपू प्रकट होतो. हल्ली टीव्ही मालिकांमधून शृंगाराऐवजी कामभावनेचे सातत्याने प्रदर्शन केले जाते. त्यामुळे अल्पवयीन मुलांची लैंगिकता उद्दीपीत होते. नकळत्या वयात कामप्रेरित झालेली ही पिढी समाजस्वास्थ्यात बिघाड करीत असते. विकृत कामभावनेतून क्रोध या रिपूचा उदय होतो.

आज घराघरांतून वादविवाद वाढू लागले आहेत. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे एखादी गोष्ट वाटून घ्यायची सवय राहिली नाही. पती-पत्नी, आई-मुलगा किंवा मुलगी यांच्यात वितुष्ट येऊ लागले आहे. संपत्तीवरून सख्ख्या नात्यात कलह सुरू झाले आहेत. पती-पत्नीच्या नात्यात अहंकारामुळे दुरावा निर्माण होऊ लागला आहे. मनुष्यामध्ये माफ करायची वृत्ती हवी, संयम हवा. या गोष्टींअभावी नातेसंबंध संपुष्टात येऊ लागले आहेत. या गोष्टींचा सामाजिकतेवर विपरीत परिणाम होतो. आज समाजात वावरताना नैतिकतेचे भय वाटेनासे झाले आहे. समाज एकसंध नसेल तर त्याचा प्रतिकूल परिणाम राष्ट्रावर होतो.

निव्वळ मतपेटीच्या राजकारणासाठी तकलादू धर्मनिरपेक्षता, भोंगळ अहिंसा खूप घातक आहे. संयम म्हणजे दुबळेपणा नव्हे, हे देशाच्या शत्रूला ठामपणे सांगावे लागते. देशपातळीवर अहिंसा किंवा अतिसज्जनपणा ही विकृती ठरते. विश्वाचा विचार करता विकसित राष्ट्रांनी आपल्या स्वार्थासाठी पर्यावरणाला वेठीस धरले आहे. या वृत्तीच्या अतिरेकातून संपूर्ण मानवी अस्तित्व नष्ट होण्याचा धोका संभवतो, अशी खंत डॉ.उपाध्ये यांनी व्यक्त केली.

प्रवचन सुरू होण्याअगोदर धनश्री हेबळीकर- शिरसीकर यांचे गायन झाले.कार्यक्रमाच्या संयोजनात प्रवीण भोकरे, गोपी बाफना, नवनाथ सरडे, विपुल नेवाळे, कलाप्पा जमखंडी, अनुप पाटील, ज्ञानेश्वर जाधव, सूर्यकांत बारसोडे यांनी परिश्रम घेतले तर सुहास पोफळे यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.