Pimpri : वणव्यात वनराई गुदमरतेय !

(श्रीपाद शिंदे)

एमपीसी न्यूज – यंदा हिवाळा म्हणावा तसा आलाच नाही. दिवसभर होणारी पा-याची चढ-उतार उन्हाळ्याची चाहूल लावत आहे. त्यामुळे पावसाळ्यात हिरवेगार झालेले डोंगर वाळले आहेत. या वाळलेल्या गवताला काहीजण जाणीपूर्वक तर काहीजणांकडून नकळत आग लागली जाते. या आगीत डोंगरांवर असलेली लहान मोठी झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. एकीकडे अनेक निसर्गप्रेमी संस्था डोंगरांवर पाण्याची व्यवस्था करून झाडे जोपासण्याचे काम करत आहेत. दुसरीकडे अशा आगीच्या घटनांमुळे त्यांनी जिवाच्या पलीकडे जपलेली झाडे आगीमध्ये जळताना पाहून त्यांचा जीव तीळ तीळ तुटत आहे. एवढ्या कष्टाने झाडे लावली जातात. कित्येक दिवस त्याला पाणी घालून त्याची निगा राखली जाते आणि एकाच क्षणात आगीत ही झाडे जळून जातात, याचे संवेदनशील मनांला दुःख होणे साहजिकच आहे. या संवेदनशील मनांसोबत या वणव्यांमध्ये वनराईचा देखील जीव गुदमरत आहे.

झाडांमुळे मनुष्याला प्राणवायू, लाकूड, सावली, फळे, फुले आणि अन्य कित्येक प्रकारची मदत होते. पण वाढत जाणा-या वृक्षतोडीमुळे झाडांची संख्या कमी होत आहे. ज्या डोंगर द-या, जंगले हिरवाईने नटलेली असत, ती आज भकास झालेली पाहायला मिळत आहेत. पृथ्वीवर मानवी जीवनाचा समतोल राखण्यासाठी झाडांची आवश्यकता आहे. त्यामुळे अनेक सामाजिक आणि निसर्गप्रेमी संघटनांनी वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यातूनच ओसाड पडलेल्या डोंगरांवर, मैदानांवर, भकास झालेल्या द-या खो-यात वृक्षारोपण केले जाते. उंच डोंगरांवर पाणी नेऊन तिथे लावलेल्या झाडांना वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. इतरांनी त्या संघटनांचे हात बळकट करणे गरजेचे आहे. पण दुर्दैव असे की हात बळकट करण्याऐवजी तेच हात कापले जात आहेत. निसर्गप्रेमींच्या आनंदावर वणवा आणि आगीचे विरजण पडत आहे.

मागील दोन वर्षांपासून तळेगाव रोटरी क्लबने परिश्रमपूर्वक तळेगाव येथे ऑक्सिजन पार्क बनविले आहे. क्लबकडून झाडे जोपासण्याचे काम अविरत सुरु आहे. या ऑक्सिजन पार्कला अज्ञातांनी पेटवून दिले. आग लावण्यासाठी रॉकेलचा उपयोग केला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण या ठिकाणी रॉकेलचा वास पसरला असल्याचे निदर्शनास आले आहे. या आगीत शंभरहून अधिक झाडे जळून खाक झाली. या घटनेमुळे रोटरीच्या सदस्यांसह निसर्गप्रेमींमध्ये देखील संताप आणि हळहळ व्यक्त करण्यात आली. ऑक्सिजन पार्कमध्ये मद्यपान करणा-यांना हटकल्याच्या रागातून ही आग जाणीवपूर्वक लावली असल्याचा प्राथमिक अंदाज रोटरी क्लबच्या सदस्यांकडून व्यक्त केला जात आहे. हे नुकसान समाजातील एखाद्या विशिष्ट घटकाचे नाही. तर आताच्या आणि पुढच्या पिढीच्या भविष्याचे नुकसान आहे. ही साधी बाब आग लावणा-यांच्या लक्षात येत नाही.

दुस-या एका घटनेत निगडीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या निसर्ग मित्र विभागाने देहूरोड जवळील घोरावडेश्वर डोंगरावर गेल्या दहा वर्षांत हजारो झाडे लावली आहेत. उन्हाळ्यात पाणी देऊन ही झाडे प्रयत्नपूर्वक जगवली आहेत. निसर्ग मित्रांनी नेहमीप्रमाणे झाडांभोवतीचे गवत अगोदरच कापलेले असल्यामुळे मागील पंधरा दिवसांखाली लागलेल्या आगीत काही झाडांना फक्त झळ लागली. तर काही झाडे पूर्णतः जळाली आहेत. त्याचबरोबर पाईपलाईन आणि पाण्याची टाकी देखील जळाली आहे. या झाडांना पाणी घालून जगवण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड मधील अनेक संस्था सहकार्य करीत आहेत. ही वनराई मोठी होण्याआधीच नष्ट होऊ लागली तर मानवाचे भविष्य धोक्यात आहे.

पण त्यावर मार्ग काढत निसर्गप्रेमी पुन्हा जोमाने वृक्षारोपण आणि संवर्धन करत असल्याचेही दिसत आहे. मागील महिन्यात काही समाजकंटकांनी तिकोना गडावर वणवा लावला. त्यामध्ये गडावरील काही झाडे जळाली. या वणव्यातून वाचलेली झाडे जगवण्यासाठी शिवप्रेमी मंडळींनी वेगळा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी सुतळी व पाण्याच्या प्लॅस्टिकच्या बाटलीचा वापर करून झाडांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्याची नवीन कल्पना सोशल मीडियावर पहायला मिळाली. त्या प्रमाणे प्रयोग करून सर्व झाडांच्या मुळाशी पाण्याची एक एक बाटली ठेवुन झाडांना पाण्याची सोय करण्यात आली आहे. झाडाच्या मुळाशी प्लॅस्टिकची पाण्याची भरलेली बाटली ठेवून तिच्या झाकणाला बारीक छेद घेऊन त्यातून एक सुतळी पाण्यात सोडून तिचे दुसरे टोक झाडाच्या मुळाशी ठेवले. त्यामुळे बाटलीमधील पाणी सुतळीच्या साहाय्याने ठिबकसिंचनाद्वारे झाडाच्या मुळाशी पोहोचणार आहे. या प्रयोगामुळे गडावरील झाडे उन्हाळ्यातही तग धरणार आहेत.

मानवी हस्तक्षेपापुढे हतबल न होता पुन्हा निसर्गसंवर्धनासाठी सज्ज होणे एवढाच मार्ग निसर्गप्रेमींपुढे आहे. त्याचबरोबर निसर्गाचा विनाश करणा-यांना कायदेशीर शासन देखील व्हायला हवेच.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.