Pimpri: साथीच्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय योजना करण्याची मागणी

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचून राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांचा उपद्रव होत असून ताप येणे, थंडी वाजून येणे, अंग दुखणे, डोके दुखणे, आदी साथीच्या आजारांचा फैलाव झपाट्याने होत आहे. त्यासाठी डेंग्यू व स्वाईन फ्लू या आजारावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे.

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात सध्या पावसाळ्याचे वातावरण असून पाऊस चांगला झाल्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचलेले आहे. नाले सफाईचा केवळ फार्स झाल्यामुळे अनेक ठिकाणी नाल्याचे पाणी साचते. तसेच काही भागांमध्ये टायर, नारळाच्या करवंट्या, जुनी प्लास्टिकची भांडी, कुंड्या आदी टाकाऊ वस्तूंमधून मोठ्याप्रमाणात डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे शहरात मोठ्याप्रमाणात डासांचा उपद्रव होत असून ताप येणे, थंडी वाजून येणे, अंग दुखणे, डोके दुखणे, आदी साथीच्या आजारांचा फैलाव झपाट्याने होत आहे.

महापालिकेतर्फे यापूर्वी धुराडे फवारणी (फॉगिंग), औषध फवारणी, डपक्यांमध्ये ऑईल टाकणे, गप्पी मासे सोडणे आदी उपाय योजना केल्या जात होत्या. त्यावर महापालिका कोट्यवधी रुपयांचा खर्च करत होती. दरवर्षीच्या बजेट प्रमाणे यावर्षीच्या बजेटमध्ये देखील कोट्यवधींची आर्थिक तरतूद असताना धुराडे फवारणी (फॉगिंग), औषध फवारणी, डपक्यांमध्ये ऑईल टाकणे, गप्पी मासे सोडणे आदी उपाय योजना करताना महापालिका दिसत नाही. त्यामुळे सध्याच्या ढगाळ व पावसाळ वातावरणामुळे डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्लूचा फैलाव खूप वेगाने शहरात होण्याची शक्यात आहे. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून व्यापक जनजागृती व योग्य त्या उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी भापकर यांनी निवेदनातून केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.