Pimpri: महापालिका अधिकारी, कर्मचा-यांच्या रजा रद्द!

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील अधिकारी, कर्मचा-यांच्या रजा रद्द केल्या आहेत. तसेच नव्याने 31 मार्च 2020 पर्यंतच्या रजा मंजूर केल्या जाणार नाहीत. याबाबतचे परिपत्रक आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पारित केले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे. शहरात तीन कोरोनाचे पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर महापालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, संशयामुळे अनेकजण स्वत:हून तपासणी करण्यासाठी महापालिका रुग्णालयात दाखल होत आहेत. जीवघेण्या कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात मध्यवर्ती नियंत्रण कक्षाची स्थापना देखील करण्यात आली आहे.

आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना वेळेत मदत पोहोच होण्यासाठी महापालिकेतील अधिकारी, कर्मचारी उपलब्ध असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालय, तसेच सर्व विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी कामावर हजर असणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व कार्यालयातील, सर्व विभागातील अधिकारी, कर्मचा-यांच्या 31 मार्च 2020 पर्यंतच्या सर्व प्रकारच्या रजा (वैद्यकीय रजा वगळून) विभागप्रमुखांनी मंजुर करु नयेत.

तसेच यापूर्वी रजा मंजुर करुन रजेवर गेलेल्या अधिकारी, कर्मचा-यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. त्या कर्मचा-यांनी त्वरित कार्यालयात रुजू व्हावे. याशिवाय अधिकारी, कर्मचा-यांनी सुट्टीच्या दिवशी देखील कार्यालयाच्या परवानगीशिवाय महापालिका कार्यक्षेत्र सोडू नये, असे परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.