Pimpri: शहरातील 41 जणांचे द्रव तपासणीसाठी पाठविले ‘एनआयव्ही’कडे!

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’चा संशय असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील 41 संशयितांच्या द्रावाचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (एनआयव्ही)कडे तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, शहरात गुरुवारी तीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. आता संशयित रुग्णांची संख्या वाढत आहे.

कोरोना बाधित रुग्णांसाठी वायसीएम रुग्णालयात दहा खांटाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर, भोसरीतील नवीन रुग्णालयात 60 खाटांचे विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. महापालिकेच्या मासुळकर कॉलनीतील रुग्णालयामध्ये ‘क्वॉरंटाईन’ कक्ष तयार करण्यात येणार आहे. संशयित म्हणून अनेकजण महापालिका रुग्णालयात दाखल होत आहेत. शहरातील 41 संशयित रुग्णांच्या द्रावाचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (एनआयव्ही)कडे तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत.

दरम्यान, वायसीएममध्ये असलेल्या कोरोना संशयित आणि पॉझिटिव्ह रुग्णांना भोसरीतील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यादृष्टीने तयारी करण्यात आली आहे. भोसरीतील कक्षात दहा जणांना दाखल करण्यात आले आहे. तपासणीसाठी स्वत:हून आलेल्या तसेच महापालिकेच्या पथकांने केलेल्या पाहणीनुसार रेफर करण्यात आलेल्या रूग्णांची प्राथमिक तपासणी केल्यानंतर गरज असेल तरच आयसोलेशन कक्षात दाखल केले जात आहे. तशा प्रकारच्या वैद्यकीय उपचारांची गरज नसेल तर होम क्वारंटाईनचा सल्ला दिला जात आहे. भोसरी रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर सुसज्ज अतिदक्षता कक्ष करण्यात येणार आहे. यामुळे रुग्णाला शहर सोडून बाहेर उपचार घेण्याची गरज लागणार नाही.

  • होम ‘क्वॉरंटाईन’चा सल्ला!
    पिंपरी-चिंचवड शहरामध्ये 231 जणांनी महिन्याभरात परदेशवारी केल्याची माहिती समोर येत आहे. तपासणी पथकांच्या माध्यमातून परदेशवारी केलेल्या व्यक्तींचा शोध घेणे सुरू आहे. असे परदेशवारी करून आलेले दोन जर्मनीतून आलेले नागरिक तपासणी पथकाच्या माध्यमातून समोर आले आहेत. याची तपासणी पुर्ण केल्यानंतर यांना कोणताही त्रास नसल्याचे निष्पण झाले. त्यामुळे यांना होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला असल्याचे वायसीएमचे उपअधिकक्षक डॉ. शंकर जाधव यांनी सांगितले. मात्र यांची वेळोवेळी पालिकेचे तपासणी पथक देखरेख करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.