Corona vaccination News : कोरोनाचे 15 हजार डोस दाखल, 16 नव्हे ‘या’ 8 ठिकाणी होणार लसीकरण

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना लसींचे 15 हजार डोस आज (बुधवारी) पहाटे अडीच वाजता दाखल झाले आहेत. उपसंचालक, आरोग्य सेवा पुणे मंडळाकडून महापालिकेकडे हे डोस प्राप्त झाले आहेत. लसीकरणाचे खासगी रुग्णालयातील केंद्र रद्द केले आहे. आता केवळ महापालिकेच्या 8 रुग्णालयात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरु होणार आहे.

महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी लक्ष्मण गोफणे यांनी ही माहिती दिली. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड -19 वैश्विक महामारीच्या नियंत्रणासाठी शासनानकडून कोविड-19 लसीकरण 16 जानेवारी 2021 पासून सुरू करण्याबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत.

ही लस आरोग्य सेवा देणा-या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना प्राधान्याने देण्यात येणार आहे. महापालिकेकडे आजपर्यंत 17 हजार 792 आरोग्य सेवा देणा-या लाभार्थींची नोंदणी झालेली आहे.

लसीकरणासाठी यमुनानगर रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, नवीन भोसरी रुग्णालय, वायसीएम रुग्णालय, पिंपळेनिलख दवाखाना, कासारवाडी दवाखाना, तालेरा रुग्णालय व ईएसआयएस रुग्णालय अशी 8 लसीकरण केंद्रे निश्चित करण्यात आलेली आहेत. या ठिकाणी आरोग्य सेवा देणा-या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांचे लसीकरण होणार आहे.

आरोग्य सेवा पुणे मंडळ यांच्याकडून कोविड 19 लसीकरणासाठी महापालिकेला 13 जानेवारी 2021 रोजी रात्री अडीच वाजता 15 हजार डोस प्राप्त झाले आहेत. 16 जानेवारी 2020 पासून निश्चित केलेल्या 8 लसीकरण केंद्रावर आरोग्य सेवा देणा-या नोंदणीकृत अधिकारी व कर्मचारी यांना प्राधान्याने देण्यात येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.