Pimpri News : ‘वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी गुरुवारी करा अर्ज ‘

पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

एमपीसी न्यूज – खासगी चारचाकी वाहन मालकांना नव्याने सुरु होणा-या मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचा क्रमांक हवा असल्यास विहित शुल्क भरुन उद्या (गुरुवार, दि.7) अर्ज करता येणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 2.30 या दरम्यान विहित नमुन्यात अर्ज करावा, असे आवाहन पिंपरी चिंचवडचे उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

परिवहन महामंडळाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, वाहनांसाठी आकर्षक नोंदणी क्रमांक ‘आरक्षित’ करण्यासाठी 8 जानेवारीला कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 2.30 या दरम्यान विहित नमुन्यात अर्ज करता येईल.

अर्ज कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डीडी, पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा. डीडी DY.R.T.O. PIMPRI CHINCHWAD यांच्या नावे नॅशनलाईज/शेड्यूल्ड बँकेचा पुणे येथील असावा.

अर्जासोबत अर्जदाराने फोटो व पत्त्याचा पुरावा साक्षांकित केलेला असावा. खासगी चारचाकीची यादी 8 जानेवारी रोजी कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. यादीतील अर्जदारांना लिलावाकरीता जास्त रकमेचा डीडी जमा द्यायचा असेल तर त्याच दिवशी दुपारी 2.30 पर्यंत सीलबंद पाकिटात कार्यालयात जमा करावा.

त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात पात्र व्यक्तीसमोर लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.

परिवहन वाहनांची यादी 11 जानेवारीला कार्यालयीन नोटीस बोर्डवर लावण्यात येईल. त्याच दिवशी दुपारी 2.30 पर्यंत सीलबंद पाकिटात डीडी जमा करावा व त्याच दिवशी दुपारी 3.30 वाजता उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या कक्षात पात्र व्यक्तीसमोर लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने पूर्वी निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डीडी सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.

वाहन क्रमांक आरक्षित केल्याचे संदेश मोबाईलवर आल्यानंतर पाचव्या दिवशी पावती कार्यालयातून घेऊन जावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. क्रमांक राखून ठेवल्यानंतर 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क सरकारजमा होईल.

कोणत्याही परिस्थितीत शुल्क परत मिळणार नसल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.