Pimpri News: ‘स्थायी’तील सहा सदस्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपमध्ये ‘विचारमंथन’

एमपीसी न्यूज – आगामी वर्ष निवडणुकीचे असल्याने नगरसेवकांची नाराजी उफाळून येवू नये यासाठी स्थायी समितीत जास्तीतजास्त सदस्यांना संधी देण्यासाठी भाजपमध्ये शेवटच्या वर्षी पुन्हा एक वर्षाची संधी देण्याच्या धोरणाबाबत विचारमंथन सुरु आहे. स्थायी समितीत एक वर्ष पूर्ण झालेल्या सहा सदस्यांचे राजीनामे घेवून नवीन सहा सदस्यांना संधी देण्याबाबत भाजपमध्ये चर्चा सुरु आहे.

त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर एक वर्ष पूर्ण झालेल्या शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे आणि भीमाबाई फुगे यांचे राजीनामे घेतले जावू शकतात, असे भाजपमधील सूत्रांनी सांगितले. असे झाल्यास भाजपचे दहाही नवीन सदस्य ‘स्थायी’त येतील.

महापालिकेतील स्थायी समिती ही अत्यंत महत्वाची समिती आहे. या समितीच्या माध्यमातून सर्व आर्थिक बाबींचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे या समितीवर वर्चस्व असणा-यांचा महापालिका कारभारात बोलबाला असतो. पालिकेचा कारभार ही समिती हाकत असते.

स्थायी समितीची सदस्य संख्या 16 असून त्यात संख्याबळानुसार भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा 1 नगरसेवक स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत.

फेब्रुवारी 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत महापालिकेत एकहाती सत्ता आलेल्या भाजपने स्थायी समितीत पाच वर्षात दरवर्षी दहा आणि अपक्ष एक अशी 55 नगरसेवकांना संधी देण्याचे धोरण केले.

_MPC_DIR_MPU_II

त्यानुसार पहिल्यावर्षी ‘ड्रॉ’मधून वाचलेल्या सदस्यांसह स्थायीच्या सर्व 10 आणि अपक्ष एक असे 11 सदस्यांचे राजीनामे घेतले होते. तथापि, दुस-यावर्षी त्या धोरणात बदल केला. आता शेवटच्या वर्षात पुन्हा राजीनामा घेण्याबाबत भाजपमध्ये विचारमंथन सुरु आहे.

मागील चार वर्षात महत्वाचे पद मिळाले नसल्याने भाजप नगरसेवकांमध्ये प्रचंड अस्वस्था, नाराजी आहे. काही जण राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कातही असल्याचे सांगितले जाते. निवडणुकीच्या तोंडावर नगरसेवकांच्या नाराजीचा स्फोट होवू नये यासाठी भाजप खबरदारी घेत आहे.

त्यासाठी शेवटच्या वर्षी जास्तीत-जास्त नगरसेवकांना ‘एम व्हिट्यामीन’ देणा-या स्थायी समितीत पाठविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यावर पक्षात खलबते सुरु आहेत. शहर प्रभारी, आमदार माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीतील बैठकीत याबाबत चर्चा झाल्याचे भाजपमधील सूत्रांनी सांगितले.

स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे, सदस्य आरती चौंधे, शीतल शिंदे, राजेंद्र लांडगे यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ 28 फेब्रुवारीला संपत आहे. तर भाजपचेच शशिकांत कदम, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, सुवर्णा बुर्डे, भीमाबाई फुगे यांचा आणखी एक वर्षाचा कार्यकाळ शिल्लक आहे.

जास्तीत-जास्त नगरसेवकांना संधी देण्याचा निर्णय पक्षाने पुन्हा घेतल्यास या सहा जणांना राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे त्यांना स्थायी समितीत एकच वर्षाचा कार्यकाळ मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.