Pimpri News: शहरातील पथविक्रेत्यांना मिळणार प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधी

या योजनेचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे. : City street vendors will get PM self-reliance funds

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील नोंदणीकृत पथविक्रेत्यांना सहाय्य म्हणून प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी अंतर्गत दहा हजार रुपये कर्ज खेळते भांडवल स्वरुपात केंद्र सरकारच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्याची योजना आखण्यात आली आहे. या योजनेचे कामकाज अंतिम टप्प्यात आहे. महापालिकेच्या वतीने या योजनेची लवकरच अंमलबजावणी होणार आहे, अशी माहिती महापौर उषा उर्फ माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

लॉकडाऊनच्या काळात पथविक्रेत्यांकडे व्यवसाय करण्यासाठी पुरेशा प्रमाणात पैसा नाही.

लॉकडाऊनमध्ये खरेदी विक्री नसल्याने पथविक्रेत्यांना हाताला काम नसल्याने त्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर निधी उपलब्ध करुन देवून नियमित परतफेड व डिजीटल व्यवहारास प्रोत्साहन देण्यावर भर दिला जाणार आहे.

त्याचबरोबर कर्जपुरवठादार बँकेकडे पथविक्रेत्यांची पत कशी निर्माण होईल याकडे गांभीर्याने लक्ष देणे हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट्ये आहे. या योजनेसाठी लाभार्थ्यांचे चार प्रकार पाडण्यात आले आहेत.

यामध्ये महापालिकेने प्रदान केलेले विक्री प्रमाणपत्र / ओळखपत्र असलेले पथविक्रेते, महापालिकेने केलेल्या सर्व्हेक्षणात आढळलेले परंतु त्यांना विक्री प्रमाणपत्र / ओळखपत्र दिले गेले नाही असे पथविक्रेते, महापालिकेने केलेल्या सर्व्हेक्षणात जे पथविक्रेते वगळलेले आहेत किंवा ज्यांनी सर्व्हेक्षण पूर्ण झाल्यानंतर विक्री सुरु केली आहे.

त्यांना महापालिका पथविक्रेता समितीने शिफारसपत्र जारी केले आहे असे पथविक्रेते, आसपासच्या विकास/फेरी- शहरी/ग्रामीण भागातील पथविक्रेते महापालिका क्षेत्रामध्ये पथविक्री करतात आणि त्यांना महापालिका किंवा नगर पथविक्रेता समितीने शिफारस पत्र जारी केले आहे.

अशा प्रकारात मोडणाऱ्या पथविक्रेत्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

यासाठी 24 मार्च 2020 व त्यापूर्वीची पथविक्रेत्यांची नोंद महापालिकेकडे असणे आवश्यक आहे. या प्रकारात मोडणारा पथविक्रेता एक वर्षाच्या परतफेड मुदतीसह दहा हजार रुपयांपर्यंतचे खेळते भांडवल घेण्यास व त्याची दरमहा हप्त्याने परतफेड करण्यास पात्र राहील. या कर्जावर आरबीआयच्या प्रचलित दराप्रमाणे व्याजदर लागू राहील.

विहीत कालावधीमध्ये कर्ज परतफेड केल्यास 7 टक्के व्याज अनुदान मिळण्यास पथविक्रेता पात्र ठरेल. तसेच त्यांनी डिजीटल माध्यमातून व्यवहार केल्यास बँकेच्या कॅशबॅक सुविधेसाठी पात्र ठरतील.

शहरातील पथविक्रेता लाभार्थ्यांना या केंद्राच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी महापालिकेचा नागरवस्ती विभाग महत्वाची भूमिका बजावणार असल्याचेही महापौर ढोरे व सत्तारुढ पक्षनेते ढाके यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.