Pimpri News: ‘पे अँड पार्क’वरुन नागरिकांमध्ये संभ्रम, 5 मिनिटांसाठी मोजावे लागतात 5 रुपये

पहिल्याच दिवशी वादावादीचे प्रकार; पार्किंग पॉलिसीची अमंलबजावणी करण्याची वेळ चुकीची, नागरिकांची नाराजी

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील 80 ठिकाणी ‘पे अँड पार्क’ची अंमलबजावणी सुरु झाली. पण, पहिल्याच दिवशी वादावादीचे प्रकार समोर आले.

नागरिकांना शहराच्या विविध ठिकाणी कामानिमित्त फिरावे लागते. प्रत्येक ठिकाणी पार्किंगसाठी 5-5 रुपये भरावे लागतात.त्यावरुन नागरिकांचा नाराजीचा सूर पहायला मिळाला. पेट्रोल, डिझेलचे भाव वाढले आहेत. कोरोनामुळे औद्योगिकनगरीतील सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती बिघडली असताना अशा कठिण प्रसंगी ‘पे अँड पार्क’ची अंमलबजावणी करणे चुकीची असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. निगडीतील संत व्यापार संकुलासमोर नो-पार्किंग असताना तिथेही वाहने पार्किंग करुन शुल्क आकारले जात असल्याचे दिसून आले.

महापालिकेच्या स्थापत्य बीआरटीएस विभागामार्फत शहरातील पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी केली जात आहे. यात 13 मुख्य रस्ते व उड्डाणपुलाखालील काही जागांचा समावेश असून त्यामध्ये एकूण 450 पे अँड पार्कची ठिकाणे आहेत. यातील सुमारे 80 जागांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. पार्किंगच्या संचलनाचे काम खासगी संस्थेला दिले आहे. पार्किंगची अंमलबजावणी आजपासून सुरु झाली. पहिल्याच दिवशी गोंधळाचे चित्र दिसून आले. नियोजनाचे अभाव पहायला मिळाला.

रस्त्याच्या कडेला दुकान असलेल्या काही व्यापाऱ्यांना त्यांच्या दुकानांसमोरच वाहन पार्किंग करण्यासाठी शुल्क भरण्यास सांगण्यात आले. त्यावरुन व्यापारी चक्रावले. आपल्याच दुकानासमोर वाहन पार्किंगसाठी शुल्क भरावे लागत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. शहराच्या विविध चौकात वाहन पार्किंगसाठी पैसे मोजावे लागत आहेत. रिक्षाचालक थांबत-थांबत प्रवासी घेतात. त्यांना एका ठिकाणी थांबण्यासाठी 5 रुपये मोजावे लागत आहेत. दिवसभर अनेक ठिकाणी थांबून प्रवासी घ्यावे लागतात. प्रत्येक ठिकाणी थांबण्यासाठी 5 रुपये भरले तर, आम्ही काय करायचे, असा सवाल एका रिक्षाचालकाने उपस्थित केला. त्यावरुन पहिल्यादिवशी अनेक ठिकाणी वादावादी झाल्याचे पहायला मिळाले. रिक्षा चालक आणि पार्किंगसाठीचे शुल्क आकारणा-यांमध्ये काही ठिकाणी वादावादी झाली. अनेक ठिकाणी अपुरे पार्कींगही वादावादीलाही‌ निमंत्रण देत आहे.

नागरिकांना शहराच्या विविध ठिकाणी कामानिमित्त फिरावे लागते. एखाद्या ठिकाणी 5 ते 10 मिनिटांचे काम असते. त्या दहा मिनिटांसाठी दुचाकी पार्किंगकरिता 5 भरावे लागतात. परत दुसरीकडे पार्क करण्यासाठी 5 रुपये मोजावे लागतात. अगोदरच पेट्रोल भरुन नाकीनऊ आले आहे. पेट्रोल 105 रुपये लिटर झाले आहे. असे असताना आता पार्किंगचा बुर्दंड सहन करावा लागत आहे. एका मिनिटाच्या कामासाठी 5 रुपये भरावे लागतात. हे अतिशय चुकीचे आहे. नागरिकांच्या खिशाला कात्री लावण्याच्या निर्णयाचा महापालिका प्रशासनाने फेरविचार करावा, असे कल्याण जाधव म्हणाले.

महापालिका प्रशासनाने अगोदर खोदलेले रस्ते दुरुस्त करावेत. पार्किंगसाठी शुल्क आकारण्याची ही वेळ नाही. सध्या प्रत्येकजण महागाईचे चटके सहन करत आहे. कोरोनामुळे सर्वसामान्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे पार्किंगसाठी पैसे घेणे चुकीचे आहे. पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी करण्याची प्रशासनाची वेळ चुकली असल्याचे, अभिजीत खैरे म्हणाले.

दरम्यान, निगडीतील संत व्यापार संकुलासमोरील रस्त्यावर नो पार्किंग आहे. तसा बोर्डही लावला आहे. पण, तिथे वाहने पार्क करण्यासाठी पार्किंग पॉलिसीचे संचलन करणाऱ्या संस्थेचे लोक नागरिकांकडून शुल्क घेत असल्याचे समोर आले. एकदंरीतच पहिल्याचदिवशी ‘पे अँड पार्क’वरुन अनेक ठिकाणी वादावादीचे प्रकार घडले. कोरोना, औद्योगिकनगरीतील कष्टकऱ्यांची खालावलेली आर्थिक परिस्थिती, वाढती महागाई असताना आता पार्किंगसाठीही शुल्क भरावे लागत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्ती केली.

असे आहेत प्रती तासाकरिता पार्किंगचे दर!
दुचाकी, रिक्षा 5 रुपये, चारचाकी 10 रुपये, टेम्पो/चारचाकी मिनी ट्रक 15 रुपये, मिनी बस 25 रुपये, खाजगी बस आणि ट्रक / ट्रेलरला एका तासासाठी 100 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.