Pimpri News: काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सायकल रॅलीने एकता, अखंडता, बंधुभाव, पर्यावरण रक्षण व तंदरुस्तीचा संदेश .

एमपीसी न्यूज: मोशी येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या वतीने पुण्यातील ०८ युवकांनी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सायकल रॅली पूर्ण केली. या सर्व सायकल पट्टूनी श्रीनगर येथील लाल चौक येथून रॅलीची सुरवात करून कन्याकुमारी येथे सांगता केली.

जम्मू व काश्मीरच्या क्रीडा विभागाचे प्रमुख श्री. रियाझ यांनी झेंडा दाखवून सायकल रॅलीची सुरुवात केली.

अत्यंत हिमवर्षाव, जोराचा थंड वारा अशा कठीण परिस्थितीत न डगमगता महाराष्ट्राच्या या युवकांनी देशाच्या सर्व नागरिंकाना एकता, अखंडता, बंधुभाव व पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी आणि सायकल वापरास प्रोत्साहन देण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

पाहिल्या दिवशी श्रीनगर ते उधमपूर, दुसऱ्या दिवशी उधमपूर ते रायपूर, तिसऱ्या दिवशी रायपूर ते रतिया, चौथ्या दिवशी रतिया ते फत्तेपूर, पाचव्या दिवशी फत्तेपूर ते बंधनवारा, सहाव्या दिवशी बंधनवारा ते मांडसार, सातव्या दिवशी मांडसार ते धार, आठव्या दिवशी धार ते धुळे, नवव्या दिवशी धुळे ते औरंगाबाद, दहाव्या दिवशी औरंगाबाद ते उस्मानाबाद , अकराव्या दिवशी उस्मानाबाद ते हुंगून, बाराव्या दिवशी हुंगून ते चित्रदुर्ग, तेराव्या दिवशी चित्रदुर्ग ते बंगलोर, चौदाव्या दिवशी बंगलोर ते दिंडीगुल व दिंडीगुल ते कन्याकुमारी असे १४ दिवस २० तासात रॅली पूर्ण करून कीर्तिमान यश संपादन केले.

या सर्वानी वातावरणातील सतत बदल, धुक्याची व हिमवर्षाची परवा न करता, महामार्गात अपघात झाले असताना व आजारी असताना देखील १४०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला.

प्रवासात सतत नागरीकांना एकता, अखंडता, बंधुभाव व पर्यावरण रक्षणचा संदेश दिला. सायकल रॅलीत सहभागी स्वारांनीं आपले अनुभव शाळेतील विद्यार्थ्यांना सांगितले.

या वेळी कशा प्रकारे या सर्वानी भारतातील सर्वात मोठा १० किलोमीटरचा बोगदा पार केल्याचा थरार कथन केला. चूक नसताना पाठीमागून दिलेल्या धडकेने जखमी असतानाही विश्रांती न घेता, मनाला मजबूत ठेऊन आपला उद्देश्य पूर्ण केला.

विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले. विद्यार्थ्यांशी संवाद साधल्याचा आनंद सायकल पट्टूनी आमच्याशी बोलताना व्यक्त केला.

श्री. प्रशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना सायकल चालविण्याने डिझेल व पेट्रोल सारखे इंधन वाचवून देशाची प्रगती करता येईल, पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, शरीर तंदुरुस्त राहील असे सांगितले.

सर्व सायकल पट्टूचे चिखली – मोशी येथील इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलच्या वतीने डॉ. संजय सिंग, श्री. प्रशांत पाटील यांनी स्वागत केले. शाळेच्या वतीने स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार केला.

सायकल रॅली मध्ये श्री. सुभाष वाजे, श्री. विजय गव्हाणे, श्री. शेख शय्येद, श्री. नवनाथ रोडगे, श्री. सचिन नेमाडे, श्री. संपत चौधरी, श्री. संतोष झेंडे यांनी सहभाग घेतला तर युवा श्री. संदीप उधाणे यांनी प्रथमचं सहभाग घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.