Pimpri News : पिंपरीतील डी. वाय. पाटीलमध्ये टॉयकॅथॉन-2021 ग्रँड फिनालेला प्रारंभ

एमपीसी न्यूज – पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि शिक्षण मंत्रालयाचा इनोव्हेशन सेल, नवी दिल्ली (एमआयसी) तसेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एआयसीटीई) यांच्या संयुक्त विद्यमाने टॉयकॅथॉन ग्रँड फिनालेला प्रारंभ झाला. याचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.

सुरवातीस टॉयकॅथॉन हे खेळणी आधारित फिजिकल टॉयकॅथॉन आणि संगणकीय खेळांवर आधारित डिजिटल टॉयकॅथॉन या दोन स्वरुपात प्रस्तावित केले होते. सध्याच्या कोविड 19 साथीच्या आजारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थी आणि सहभागींच्या सुरक्षेच्या दृष्टीने दि. 22 जून 2021 ते 24 जून 2021 या काळात डिजिटल हॅकाथॉनचे आयोजन करण्यात येत आहे‌.

या स्पर्धेसाठी डॉ.डी.वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयाची एमआयसी व एआयसीटीई यांनी टॉयकॅथॉन- 2021, ग्रँड फिनाले आयोजनासाठी निवड केली आहे. देशी खेळणी उद्योगास प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या विविध भागांतील निवडक 1567 संघांनी 85 नोडल सेंटरच्या माध्यमातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे सहभाग नोंदवला आहे.

टॉय उद्योगात पंतप्रधान मोदी यांच्या ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेवर जोर देताना शिक्षण मंत्रालयाने इतर मंत्रालयासोबत मल्टी ट्रॅक देश-व्यापी टॉयकॅथॉनची संकल्पना मांडली. शिक्षण मंत्रालय आणि महिला व बाल विकास मंत्रालय (एमडब्ल्यूसीडी), माहिती व प्रसारण मंत्रालय, वाणिज्य व उद्योग मंत्रालय, लघु व मध्यम उद्योग मंत्रालय आणि मंत्रालय वस्त्रोद्योग ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनमधील शिक्षण मंत्रालयाचा इनोव्हेशन सेल यांनी संयुक्तपणे टॉयकॅथन 2021 आयोजित केले आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील , तसेच डॉ.डी.वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे सचिव डॉ.सोमनाथ पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. प्रमोद पाटील व महाविद्यालयाच्या उद्योजकता विकास विभागाच्या अधिष्ठाता व कार्यक्रमाच्या समन्वयक, डॉ. भावना अंबुडकर आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.