Pimpri Corona News : कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 10 दिवसांत 16 लाखाचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाल्याने निर्बंध शिथील केले आहेत. परंतु, निर्बंध शिथील होताच नागरिकांची बेफिकिरीही वाढली असल्याचे समोर आले आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये मास्क न वापरणाऱ्या व कोविडविषयीच्या इतर नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाई करत त्यांच्याकडून तब्बल 15 लाख 80 हजार रुपये दंड वसूल केला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर शहरात अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परंतु नागरिक नियम पायदळी तुडवून विनामास्क फिरतात. त्यांच्यावर कारवाईसाठी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी कोविड मार्शल नेमण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, शहरात 480 जणांची कोविड मार्शल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

शहरात विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना समज देऊन त्यांच्याकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. तसेच महापालिकेच्या वतीने मास्क उपलब्ध करून दिला जात आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आहे.

मात्र कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याचा धोका तज्ज्ञांकडून दिला जात आहे. असे असले तरी शहरातील नागरिकांना मात्र कोरोना नियमांचे गांभीर्य नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. गेल्या दहा दिवसांत कोविड मार्शलने तब्बल 15 लाख 80 हजार रुपये दंडाची रक्कम वसूल केली आहे.

याव्यतिरिक्त निर्धारित केलेल्या वेळेव्यतिरिक्त दुकाने चालू ठेवल्यास दुकानदारांवरही कारवाई करण्यात येत आहे. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तीन कर्मचाऱ्यांचे एक पथक याप्रमाणे संपूर्ण शहरात 160 पथके तयार करण्यात आली आहेत.

शहरातील बाजारपेठा, मंडई, गर्दीची ठिकाणे, रहदारीचे रस्ते आदी ठिकाणी सदर पथके लक्ष ठेवत आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी वीस पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. या पथकांची विभागणी करून, सकाळी सात ते रात्री अकरा या वेळात ती कार्यरत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.