Pimpri News: राजशिष्टाचाराच्या उल्लंघनामुळे सोडत रद्द ! राष्ट्रवादी, भाजपचे आंदोलन अन् आयुक्तांचा ‘माफीनामा’

प्रधानमंत्री आवास योजनेची लकी ड्रॉ 'सेट' असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप

एमपीसी न्यूज – प्रधानमंत्री आवास योजनेतील सदनिकांच्या सोडतीवरुन आज बरेच नाट्य घडले. उपमुख्यमंत्र्यांना डावलून भाजपने राजशिष्टाचाराचे उल्लंघन केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने आंदोलन केले. सोडतीच्या ठिकाणी महापौरांसह भाजप पदाधिकारी आले, तरी प्रशासनाचा एकही अधिकारी हजर नव्हता. दरम्यानच्या काळात मंत्रालयातून सुत्रे हलली आणि सोडतच रद्द केल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर प्रशासनाने महापौरांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपने आयुक्तदालनासमोर ठिय्या मांडला. अखेरीस, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी जनता आणि लोकप्रतिनिधींची माफी मागितली. त्यानंतर भाजपने आंदोलन मागे घेतले. दरम्यान, आवास योजनेचा लकी ‘ड्रॉ’ सेट असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादीने केला आहे.

राजशिष्टाचाराचे उल्लंघन झाल्याने सोडत रद्द – आयुक्त हर्डीकर

राजशिष्टाचाराची काही तत्वे असतात. त्याचे पालन केले जाते. स्वनिधी, शासनाच्या अनुदानातून केलेले काम असेल तर सर्वांना राजशिष्टाचारानुसार आमंत्रित करणे अपेक्षित असते. केवळ पत्रिकेत नाव घातले म्हणजे निमंत्रण दिले असे होत नाही. वेळ घ्यावी लागते. आज वेळ घेतलेली नव्हती. त्यामुळे मी वरिष्ठांशी चर्चा केली. राजशिष्टाचाराचा भंग झाल्याचे सकृतदर्शनी निदर्शनास आले आहे. तरीही, सोडत होण्यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्नशिल होतो. वेगवेगळे पर्याय शोधत होतो.

पण, काही कारणांनी सोडत होवू शकली नाही. त्यामुळे शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधींची मी माफी मागतो. नियोजनात प्रशासन दोषी आहे का हे शोधण्यात येईल, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.

आपल्या नावाचा गाजावाजा व्हावा यासाठी प्रशासनाला वेठीस धरणे चुकीचे – महापौर ढोरे

_MPC_DIR_MPU_II

सर्वसामान्य लोकांना स्वतःचे घर मिळणार आहे. नागरिकांनी कागदपत्रांची पुर्तता करुन अर्ज भरले आहेत. त्यांना पुढील आर्थिक नियोजन करण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे आज सोडत ठेवली होती. पण, काही जणांकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे काम मीच केले याचा गाजावाजा व्हावा, यासाठी प्रशासनाला वेठीस धरले जात आहे. महापालिकेत भाजपची सत्ता आहे.

महापालिका इतिहासात महापौरांना खाली बसावे लागले. राष्ट्रवादीने शहरातील जनतेचा अपमान केला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या अपमान होवू नये यासाठी त्यांना थांबवले. ज्यांनी सोडत रद्द केली त्यांचा आणि प्रशासनाचा धिक्कार करत असल्याचे महापौर उषा ढोरे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीने नव्हे तर सत्ताधाऱ्यांनी आपापसातील वादात जनतेचे नुकसान केले – राजू मिसाळ

भाजपाने आमच्या नावाने टाहो फोडण्यापेक्षा या सोडतीमध्ये अनेकांनी त्यांचा ‘ड्रॉ’ सेट केला आहे. घर मिळवून देतो असे सांगून सत्ताधारी कष्ट्रक-यांना फसवत आहेत. ‘ड्रॉ’ काढताना केवळ भाजपचेच पदाधिकारी असणार म्हणजे काय ?. ठराविक लोकांचे ‘ड्रॉ’ काढून इतरांना फसवणा-यांना एका दृष्टीने आम्ही चाप लावला आहे. भाजपची ‘डीजीटल’ चोरी चालणार नाही हे त्यांनी ध्यानात घ्यावे. भाजप आमदारांच्या हस्ते ‘ड्रॉ’ करायचा तर आपल्या शहरातील दोन आमदार भाजपचे कर्तव्यनिष्ठ नाहीत का ? असाही प्रश्न आहे.

ज्यांनी पालकमंत्री असताना शहरास काही दिले नाही. त्यांनी आता काय मन उदात्त करावे ही पण शकां आहेच. कष्टकरी गोरगरीबांना घरे निश्चित मिळाली पाहिजेत. पण त्यांचा जीव टांगणीस कशाला ?. रावेत येथील गृहप्रकल्पाच्या जागेला न्यायालयाची स्थगिती आहे. तेथे एखाद्याचा ड्रॉचा नंबर लागला तर या गरीबांना घर कधी देणार याचा कालावधी सत्ताधारी देणार का ? असा सवाल विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी केला.

महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने मनमानी पद्धतीने कामे केली जात आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी राजशिष्टाचार असतो, त्याचे पालन भाजपची सत्ता आल्यापासून केले जात नाही. श्रेयवाद करण्यासाठी राजकारण केले जात आहे. वाकडमधील विकासकामे उदघाटन करण्यासाठी महापौर यांना पत्र दिले आहे. मात्र, महापौर राज्यसरकारमधील मंत्र्याना निमंत्रण पत्र देत नाहीत. राजशिष्टाचार पुण्याच्या महापैारांना कळतो. परंतु, आपल्या महापौरांना कळत नाही. राजशिष्टाचाराचे उल्लंघन करुन सत्ताधाऱ्यांनी स्वतः आंदोलन करने ही बाब हास्यास्पद आहे. यावरुन महापौर चिंचवड़ मधील स्थानिक नेत्याच्या दबावाखाली काम करीत आहेत. -राहुल कलाटे, गटनेता शिवसेना

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.