Pimpri News : बनावट एफडीआर प्रकरणातील सर्व ठेकेदारांवर गुन्हे दाखल करा- रफिक कुरेशी

एमपीसीन्यूज : पिंपरी चिंचवड महापालिकेत बनावट एफडीआर देऊन महापालिकेची फसवणूक करणाऱ्या फक्त 5 ठेकेदारांवर महापालिकेने गुन्हा दाखल केला आहे. बाकीच्या 15  ते 20 ठेकेदारांना का सोडले ?, गुन्हा सर्वांचा एकच होता मग फक्त 5  ठेकेदारांवरच गुन्हा का दाखल केला, असा सवाल समाजवादी पक्षाकडून उपस्थित करण्यात आला आहे. या प्रकरणातील सर्व ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे.

याबाबत समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रफिक कुरेशी यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे.

ठेकेदारांची एवढी मोठी फसवणूक महापालिका अधिकाऱ्यांच्या वेळीच लक्षात आली नाही की त्यांनी हेतुपुरस्सर ही लबाडी लपवली. यामध्ये महापालिका लेखा विभाग व टेंडर विभागातील संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्या कामात कुचराई केल्याचे दिसते. त्यामुळे आरोपींना मदत केली म्हणून सहआरोपी करून त्यांच्यावरही गुन्हा दाखल व्हावा.

महापालिकेत आमदारांच्या दबावाखाली थेट पद्धतीने कामे देऊन पात्र असलेल्या ठेकरांना डावलण्यात येते, हे लोकशाहीस मारक आहे. थेट पद्धतीने दिलेली सर्व कामे त्वरित थांबविण्यात यावीत; अन्यथा समाजवादी पार्टीच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कुरेशी यांनी निवेदनात दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.