Pimpri News : लाभार्थ्यांना घरकुलाचा ताबा द्या; अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू

महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष व विधी विभागाचा महापालिका प्रशासनाला इशारा

एमपीसीन्यूज : चिखली घरकुल वसाहत येथील पात्र व बँकेचे हफ्ते सुरु असलेल्या सर्व लाभार्थ्यांना तातडीने घरांचा ताबा द्यावा. येत्या आठ दिवसात ही कार्यवाही पूर्ण करावी; अन्यथा महापालिका झोपडपट्टी निर्मूलन विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष व विधी विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.

याबाबत मनसेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांसह झोपडपट्टी निर्मूलन विभागाला निवेदन देण्यात आले आहे. मनसे जनहित कक्ष व विधी विभागाचे शहराध्यक्ष राजू भालेराव, मिलिंद सोनवणे, शिरीष महाबळेश्वरकर, संतोष शिंदे आणि गणेश आमले आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे झोपडपट्टी निर्मूलन विभागाने चिखली येथे काही वर्षापूर्वी घरकुल प्रकल्प राबविला होता. त्यावेळी घर ताब्यात देण्यापूर्वी लाभार्थ्याने पूर्ण पैसे भरावे; अन्यथा बँकेचे कर्ज घेऊन त्याचा हप्ता भरावा व घर आपल्या ताब्यात घ्यावे असे महापालिकेने नियोजन केले होते. त्यानुसार असंख्य लाभार्थ्यांनी आवश्यक ती पूर्तता करून घराचा ताबा देखील मिळवला.

मात्र, अजूनही साधारण घरकुल वसाहतीमधील चार सोसायट्यांमध्ये घराचा ताबा मिळत नसल्याने लाभार्थी हवालदिल झाले आहेत. या ठिकाणी अनेक पात्र लाभार्थ्यांनी नियमानुसार सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत. तसेच अनेक लाभार्थ्यांचे बँकेचे कर्ज मंजूर झालेले आहे. त्याचे हप्ते देखील सुरु झालेले आहेत.

मात्र, तरीही संबंधित विभागाने घरांची सोडत ( lucky draw) न काढल्याने अजूनही त्यांना घरांची प्रतीक्षा करावी लागत आहे. याला जबाबदार कोण ? ज्या घराकरिता बँकेकडून कर्ज घेतले, ते घरच ताब्यात नाही मग लाभार्थ्यांनी नुसते हप्ते भरायचे का ? lucky draw काढायला मनपा आता काय मुहूर्त काढणार का ?, असे सवाल मनसेने उपस्थित केले आहेत.

लाभार्थ्यांकडून याबाबत झोपडपट्टी निर्मूलन विभागाकडे विचारणा केली तेव्हा त्यांना ऑक्टोबर महिन्यापासून वेगवेगळ्या तारखा देण्याचे काम चालू आहे. हा काय प्रकार आहे ?. गेली अनेक महिने लाभार्थ्यांना घरांचा ताबा न देण्यामागे मनपाचे काय गौडबंगाल आहे ?.

घरकुल मधील लाभार्थी हे अत्यंत गरीब व हातावरचे पोट असणारे आहेत. कोणी व्याजाने पैसे घेऊन तर कोणी उसने पैसे घेऊन या ठिकाणी पैसे भरले आहेत. असे असताना त्यांना त्वरीत घरांचा ताबा द्यायला पाहिजे. मात्र, महापालिका प्रशासनाच्या भोगलं व नियोजनशून्य कारभाराचा फटका या लाभार्थ्यांना सहन करावा लागत आहे.

येत्या आठ दिवसात ज्या लाभार्थ्यांनी पैसे भरले आहेत त्यांना त्वरित घरांचा ताबा देण्यात यावा. तसेच घरे न देता त्या घराकरिता काढलेल्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम / लाभार्थ्याने बँकेत भरलेल्या कर्जाची रक्कम, नुकसान भरपाई म्हणून सर्व लाभार्थ्यांना व्याजासहित परत द्यावी, तसेच लाभार्थ्यांना घराचा ताबा देण्याकरिता झालेल्या विलंबाचा लेखी खुलासा करावा; अन्यथा आपल्या कार्यालयाला टाळे लावून निषेध करण्यात येईल, असा इशारा मनसेने दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.