Pimpri news: ब्रॅण्डेड, जेनेरिक औषधे खरेदीवर सव्वापाच कोटींचा वाढीव खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सर्व दवाखाने, रूग्णालयांसाठी आवश्यक असणारी ब्रॅण्डेड औषधे, जेनेरिक औषधे आणि सर्जिकल साहित्य तीन पुरवठादारांकडून खरेदी करण्यात येतात. यासाठी दोन वर्षे कालावधीकरिता एक कोटी रूपये खर्च अपेक्षित असताना कोरोना महामारीच्या संकटामुळे औषधे, साहित्य खरेदीवर तब्बल सव्वापाच कोटींचा वाढीव खर्च होणार आहे. तीन पुरवठादारांना हा खर्च देण्यात येणार आहे.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रूग्णालयासह सर्व दवाखाने, रूग्णालयांसाठी आवश्यक असणारी औषधे व साहित्य पुरवठा महापालिकेच्या मध्यवर्ती औषध भांडार विभागामार्फत करण्यात येतो. तथापि, अपवादात्मक परिस्थितीत रूग्णांसाठी आवश्यक औषधे किंवा साहित्याचा पुरवठा मध्यवर्ती औषध भांडाराकडून होत नाही. त्यामुळे वायसीएम रूग्णालयातील औषध भांडारात शिल्लक नसणारी तसेच मध्यवर्ती औषध भांडाराकडील निविदेत समाविष्ट नसणाऱ्या औषधांची खरेदी वायसीएम रूग्णालयामार्फत निश्चित केलेल्या स्थानिक एजन्सीकडून निविदा प्रक्रीया राबवून खरेदी केली जातात.

त्यामध्ये ब्रॅण्डेड औषधे, जेनेरिक औषधे, सर्जिकल साहित्य खरेदी केले जाते. ब्रॅण्डेड औषधांच्या किमतीवर 15.50 टक्के सुट, जेनेरिक औषधांच्या किमतीवर 56.70 टक्के सुट आणि सर्जिकल साहित्याच्या किमतीवर 54 टक्के सुट या दराने ओमनी हेल्थकेअर सिटीकेअर फार्मसी, कोठारी मेडीकल आणि रूबी अलकेअर सर्व्हिसेस या तीन एजन्सीज निश्चित करण्यात आल्या आहेत.

रूग्णालयांकरिता तातडीने आवश्यक औषधे, साहित्य खरेदीकरिता, तातडीक सेवा विचारात घेता औषधांची उपलब्धता आणि वेळेवर रूग्णोपचार होण्यासाठी एका बाबींकरिता एका पुरवठाधारकावरच अवलंबून न राहता एकापेक्षा जास्त पुरवठाधारक असावेत, या हेतूने या तीनही पुरवठादारांकडून औषधे, साहित्य खरेदी करण्यात येतात.

या निविदेचा कालावधी 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 असा दोन वर्षाचा आहे. त्यासाठी एक कोटी रूपये खर्चास स्थायी समिती सभेने मान्यता दिलेली आहे. कोरोना संकटामुळे महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयासह इतर रूग्णालयांअंतर्गत विलीनीकरण कक्ष सुरू करण्यात आले.

1 सप्टेंबर 2020 पासून ऑटोक्लस्टर आणि अण्णासाहेब क्रीडा संकुल येथे जम्बो कोविड रूग्णालय सुरू करण्यात आले. या विभागांना आवश्यक साहित्य पुरवठा मध्यवर्ती औषध भांडार विभागाकडून करण्यात येत होता. मात्र, या निविदा प्रक्रियेत कोरोनाकरिता आवश्यक औषधे, साहित्य यांची खरेदी समाविष्ट नव्हती. त्यातच लॉकडाऊनमुळे मध्यवर्ती भांडाराकडील पुरवठाधारकांकडून औषधे, साहित्याचा मागणीनुसार पुरेशा प्रमाणात पुरवठा होत नव्हता.

त्यामुळे रूग्णसेवेत अडथळा ठरू नये, याकरिता कोरोना रूग्णांवर उपचारासाठी एप्रिल 2020 पासून तातडीक औषधे, साहित्य खरेदी नेमणूक केलेल्या या तीन पुरवठाधारकांकडून उपलब्ध करून घेतली जात आहे.

मात्र, या निविदेसाठी मंजुर असलेल्या एक कोटी रूपयांमधून ठेकेदारांनी पुरवठा केलेल्या औषधांच्या बिलांची पूर्तता करणे शक्य होत नाही. त्यामुळे 3 कोटी 50 लाख रूपये वाढीव खर्चास स्थायी समिती सभेने 13 जानेवारी 2021 रोजी मान्यता दिली. या वाढीव खर्चाची मर्यादा संपुष्टात आली आहे.

त्यातच काही दिवसांपासून पुन्हा कोरोना रूग्ण संख्येत प्रचंड वाढ होऊ लागल्याने जानेवारी 2021 मध्ये बंद केलेले अण्णासाहेब क्रीडा संकुलातील जम्बो रूग्णालयासह इतर बंद केलेली कोरोना केअर सेंटर टप्प्याटप्प्याने आवश्यकतेनुसार पुन्हा सुरू करण्यात येत आहेत.

ठेकेदारांनी पुरवठा केलेल्या बिलांपोटी 1 कोटी 70 लाख रूपये रकमेची पूर्तता होणे बाकी आहे. निविदेची मुदत 31 मार्च 2022 पर्यंत असल्याने 1 कोटी 70 लाखाच्या प्रलंबित बिलांसह वाढीव 3 कोटी 50 लाख रूपये याप्रमाणे एकूण 5 कोटी 20 लाख रूपये इतका वाढीव खर्च होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.