New Delhi news: पिंपरी ते निगडीपर्यंतच्या मेट्रो विस्तारीकरणाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात; लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता – खासदार श्रीरंग बारणे

खासदार बारणे यांनी घेतली केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रोचे पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावरील काम अंतिम टप्यात आले आहे. तर पिंपरी ते निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो सरू करण्याची मोठी आवश्यकता आहे. राज्य सरकारने त्याला मान्यता दिली आहे. केवळ केंद्र सरकारची मान्यता बाकी आहे. त्याबाबतचा प्रस्ताव देखील अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पिंपरी ते निगडीपर्यंत मेट्रो विस्तारी करणास येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी द्यावी, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे केली आहे. त्यावर राज्य सरकारच्या प्रस्तावाची माहिती घेऊन मान्यता देण्याचे आश्वासन पुरी यांनी दिल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले आहे.

खासदार बारणे यांनी संसद भवनात मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेतली. यावेळी निगडीपर्यंत मेट्रोची किती आवश्यकता आहे याचे महत्व पटवून दिले. पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रोच्या कामाची सविस्तर माहिती मंत्री पुरी यांना खासदार बारणे यांनी दिली.

पुणे मेट्रो रेल अंतर्गत स्वारगेट ते पिंपरी या मार्गाला केंद्र सरकारने पहिल्या टप्यात मंजूरी दिल्यानंतर पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावरील काम अंतिम टप्यात आले आहे.

पिंपरी ते निगडीतील भक्ती-शक्ती चौकपर्यंत मेट्रो सरू करावी अशी शहरवासीयांची मागणी आहे. ही मागणी अतिशय रास्त असून निगडीपर्यंत मेट्रोची आवश्यकता आहे. अन्यथा मेट्रोचा काही उपयोग नाही, अशी नागरिकांची भावना आहे.

याबाबत अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत आहे. हा प्रस्ताव अंतीम टप्प्यात आहे. त्यापार्श्वभूमीवर खासदार श्रीरंग बारणे यांनी शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांची भेट घेवून वेळोवेळी केलेल्या पत्र व्यवहारासह महाराष्ट्र सरकारने दिलेली मंजूरी, येणाऱ्या खर्चाच्या मंजुरी बाबतचे पत्र देवून केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी घेवून हा प्रस्ताव मान्य करण्याची विनंती केली.

पिंपरी ते निगडी पर्यंत मेट्रोला मंजूरी मिळावी. या करीता 19 डिसेंबर 2017 रोजी खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय शहरी विकास मंत्र्यांना पत्र दिले होते. याच पत्रान्वये 10 जानेवारी 2018 रोजी केंद्रीय मंत्र्याने महाराष्ट्र सरकारला पत्र पाठवून या विस्तारीकरणास मंजूरी दिल्याचे कळवले होते.

26 जून 2019 रोजी शहरी विकास मंत्र्यांनी महाराष्ट्र सरकारने पाठविलेला विकास आराखडा (डीपीआर) स्वीकारण्यात आल्याचे सांगितले.

5 फेब्रुवारी 2020 रोजी केंद्रीय शहरी विकास मंत्र्यांने पुणे मेट्रो अंतर्गत निगडीतील भक्ती-शक्ती चौक पर्यंतच्या विस्तार करणाला भारत सरकारच्या 100 दिवसाची प्रगती या कार्यक्रमात सहभागी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

18 मार्च 2020 ला पून्हा शहरी विकास मंत्रालयाने राज्य सरकारला पत्र पाठवून या विस्तारीकरणाच्या खर्चाबाबत विचारणा केली होती. 4 ऑगस्ट 2020 रोजी केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी मार्च महिन्यापर्यंत येणारा खर्च, त्यांची मंजुरी व डिझाईन इतर बाबी या बाबत सहमती मागितली.

महाराष्ट्र सरकारने जून 2020 मध्ये मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देऊन प्रस्ताव पाठवला होता. याबाबत महाराष्ट्र सरकारने केंद्रीय शहरी विकास मंत्रालयास पत्र पाठवून कळविले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 155 कोटीचा हिस्सा व पहिल्याच टप्प्यात हा प्रकल्प घेतल्याने त्याचे अंतर कमी असल्याने महाराष्ट्र सरकार पहिल्या टप्प्यातील हिस्सा देण्यास तयार असल्याबाबत खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांना भेटून सांगितले.

आत्ता पर्यंत झालेल्या कार्यवाहीची कल्पना देवून केंद्रीय कॅबिनेटमध्ये पुणे मेट्रो अंतर्गत पहिल्या टप्यात निगडी भक्ती-शक्ती चौक पर्यंत लवकरात लवकर मंजुरी द्यावी अशी विनंती केली.

यावर केंद्रीय शहरी विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी राज्य सरकारकडून आलेल्या प्रस्तावाची माहिती घेतली जाईल. त्यांनतर तत्काळ मंजुरी देण्याचे आश्वासन दिल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.