Pimpri News : पिंपरी-चिंचवड शहरातील सहा किलोमीटरच्या टप्प्यात मेट्रोची चाचणी पूर्ण

एमपीसी न्यूज – पुणे मेट्रोच्या कामाने वेग घेतला असून आतापर्यंत 45 टक्के काम पूर्ण झाले आहे. पीसीएमसी ते स्वारगेट व वनाझ ते रामवाडी या दोन मार्गिकांमध्ये व्हायाडक्ट, स्टेशन आणि भूमिगत मार्गांची कामे प्रगतीपथावर चालू आहेत. वनाज व रेंज हिल्स येथील डेपो उभारण्याचे काम देखील प्रगतीपथावर आहे.

10 जानेवारी 2020 रोजी पीसीएमसी ते संत तुकारामनगर या एक किलोमीटरच्या मार्गावर पहिली चाचणी घेण्यात आली. त्यानंतर एका वर्षाने आज (रविवारी, दि. 3) पीसीएमसी ते फुगेवाडी या सहा किलोमीटरच्या अंतरावर मेट्रो धावली. कोरोनामुळे सहा ते सात महिने कामाचा वेग मंदावला होता. तरी देखील हा महत्वपूर्ण टप्पा मेट्रोने आज पूर्ण केला.

दुपारी दीड वाजता मेट्रोला ट्रेन पीसीएमसी स्थानकावरून सुटली. दुपारी दोन वाजता फुगेवाडी या स्थानकावर पोहोचली. आजच्या चाचणीसाठी कार्यकारी संचालक डी. डी. मिश्रा, मुख्य प्रकल्प अभियंता रवी कुमार, संदीप साकले, श्रीराम मांझी, राजा रमण, रवी टाटा या मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी परिश्रम केले.

चेतन फडके या ट्रेन ऑपरेटरने ही ट्रेन चालविली. या चाचणीसाठी ओएचई (OHE) तारा 25 के.व्ही विद्युत भाराने सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत सुरु केल्या. विद्युत तारांची तंदुरुस्ती तसेच सहा किलोमीटर रेल्वे रुळ (ट्रॅक) त्याची सुरक्षेतेच्या दृष्टीने निरीक्षण अश्या अनेक बाबींची पूर्तता करून आजची चाचणी यशस्वीरीत्या पार पाडली.

पुणे मेट्रोने रिसर्च, डिझाइन स्टँडर्डाजाइजेशन (RDSO), कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी (CMRS), आणि रेल्वे बोर्ड यांच्याकडे आवश्यक त्या परवानग्या मिळण्यासाठी अर्ज केला असून चाचणीची पुर्तता महामेट्रोने पूर्ण केली आहे. आज घेण्यात आलेली चाचणी पुणे मेट्रोच्या कामामधला एक महत्वाचा टप्पा आहे.

महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित म्हणाले, “आजची चाचणी महामेट्रोने केलेल्या अथक प्रयत्नाचे फळ आहे. सर्व पुणे करांचा पुणे मेट्रोच्या कामात प्रचंड सहयोग असल्यामुळेच महामेट्रो हे काम यशस्वीरीत्या पुर्ण करू शकत आहे.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.