Pimpri News: शरद पवार यांची मेट्रो ट्रायल रन, महापौर म्हणतात, कोणत्याही प्रकारचे वैधानिक पद नसलेल्या…

एमपीसी न्यूज – लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता कोणत्याही प्रकारचे वैधानिक पद नसलेल्या तसेच ठराविक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना डोळ्यासमोर ठेऊन महामेट्रोचा मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोप करत महामेट्रोच्या कारभाराबद्दल आम्ही असमाधानी असून त्याबद्दल लवकरच केंद्र व राज्य शासनाकडे तक्रार करणार असल्याचे महापौर उषा ढोरे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पिंपरीतील फुगेवाडी ते संत तुकाराम नगर असा मेट्रो प्रवास आज केला. मेट्रोची ट्रायल रनही झाली. त्यावरुन भाजपने टीकास्त्र सुरु केले आहे. महापौर ढोरे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, पुणे महामेट्रोच्या अधिका-यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांचे महापौर, पदाधिकारी यांना कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना अथवा माहिती न देता गुप्तपणाने पुणे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालकांनी मेट्रोची ट्रायल रन घेतली. त्यांच्या या कामकाजातून दुटप्पीपणाची भूमिका व वागणूक दिली जात असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

सध्या राज्यासह संपूर्ण जगावर कोरोना संकटाचे गडद सावट असताना अशा परिस्थितीत पुणे मेट्रोची ट्रायल रन घेणे कितपत योग्य व रास्त आहे. यासंबंधी महामेट्रोचा हेतू व उद्देशाबाबत शंका निर्माण होत आहे. पुणे महामेट्रो हा प्रकल्प मुळातच केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून साकारला जात असताना तसेच कोणत्याही स्वरुपाचे राजकीय शिष्टाचार न पाळता स्वारगेट ते पिंपरी या मेट्रो मार्गिकेचे काम हे अंतिम टप्प्यात असून मेट्रोच्या कामाबद्दलची माहिती ही परस्पर देण्यात आलेली आहे.

तसेच आपला देश हा लोकशाही प्रधान असून वैधानिक पदावरील व्यक्तींना विश्वासात घेऊन चालण्याची आपली परंपरा राहिलेली आहे. तरी देखील पुणे तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता कोणत्याही प्रकारचे वैधानिक पद नसलेल्या तसेच ठराविक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना डोळ्यासमोर ठेऊन महामेट्रोचा मनमानी कारभार सुरु असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे आपल्या लोकशाही परंपरेला छेद देणारी पुणे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालकांची संपूर्ण कृती ही लोकशाहीचा अवमान करणारी आहे. त्यामुळे महामेट्रोच्या संपूर्ण गलथान व गैरजबाबदार कारभाराबद्दल आम्ही असमाधानी असून त्याबद्दल लवकरच केंद्र व राज्य शासनाकडे महानगरपालिकेच्या वतीने तक्रार करण्यात येणार असुन पुणे महामेट्रोच्या कामकाजाबद्दल आम्ही नाराज असल्याने त्यांचा निषेध करीत आहोत. असेही महापौर ढोरे म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.