Pimpri News: उर्जा बचतीसाठी महापालिका बसविणार ‘एलईडी’ पथदिवे, 40 कोटी खर्च अपेक्षित

एमपीसी न्यूज – नगरविकास खात्याच्या आदेशानुसार महापालिका हद्दीत पारंपरिक दिव्यांच्या ठिकाणी एलईडी दिवे खरेदी न करता ‘एनर्जी एफिशिएंशी सर्व्हिस लिमिटेड’ या कंपनीच्या माध्यमातून उर्जा बचत करणारे एलईडी दिवे बसविणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार ‘ईईएसएल’ मार्फत पुढील आठवड्यात पिंपरी-चिंचवड शहरात एलईडी पथदिवे बसविण्यात येणार आहेत. तीन महिन्यात त्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे 40 कोटी खर्च अपेक्षित आहे.

याबाबतची माहिती सभागृह नेते नामदेव ढाके यांनी दिली. नॅशनल स्ट्रिट लाईट प्रोग्राम (NSLP) अंतर्गत उर्जा बचतीच्या अनुषंगाने पारंपरिक पथदिव्यांच्या ठिकाणी उर्जा बचत करणारे एलईडी पथदिवे बसविण्याकरिता केंद्र शासनाच्या विद्युत मंत्रालयाच्या अंगीकृत उपक्रम असलेल्या एनर्जी एफिशिएंशी सर्व्हिस लिमिटेड (EESL) या कंपनीच्या माध्यमातून एलईडी दिवे बसविण्याकरीता करारनामा केलेला आहे.

नगरविकास विभागाचा 4 जून 2018 च्या शासन निर्णयानुसार यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांनी पारंपरिक दिव्यांच्या ठिकाणी एलईडी दिवे खरेदी न करता एनर्जी एफिशिएंशी सर्व्हिस लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून उर्जा बचत करणारे एलईडी दिवे बसविणे बंधनकारक केले आहे.

याकरीता महापालिकेकडून बसविण्यात आलेल्या एलईडी पथदिव्यांच्या ठिकाणी ईईएसएलच्या माध्यमातून एलईडी पथदिवे बसविणेकामी महासभा, स्थायी समितीने 2019 मध्येच मान्यता दिली आहे.

ईईएसएल या कंपनीच्या माध्यमातून महापालिकेच्या रस्त्यावरील पारंपरिक पथदिवे बदलून त्याऐवजी उर्जा बचत करणा-या एलईडी फिटींग बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी रस्त्यावर,उद्यान व खेळांचे मैदानाच्या ठिकाणी पथदिव्यांच्या सर्वेचे काम करण्यात आले आहे.

विविध प्रकारच्या व क्षमतेचे मिळून पथदिव्यांची संख्या एकूण 83 हजार 491 आहे. सन 2012-13 पासून महापालिकेमार्फत उर्जा बचत करणारे 49 हजार 748 इतके एलईडी दिवे बसविण्यात आलेले आहेत. उर्वरीत 33 हजार 743 एलईडी पथदिवे बसविणे बाकी आहे.

पारंपरिक दिवे काढून एलईडी पथदिवे बसविलयास 50 टक्के उर्जा बचत होईल. सध्याच्या दिव्यांच्या रस्त्यावरील प्रकाशा इतकेच किंवा त्यापेक्षा जादा प्रकाश पडेल. या क्षमतेचे दिवे बसविण्यात येणार आहेत. बदलण्यात येणा-या दिव्यांच्या संख्येनुसार वीज युनीट मध्ये किमान 50 टक्के बचत होणार आहे.

ईईएसएल मार्फत पुढील आठवड्यात एलईडी पथदिवे बसविण्याचे काम सुरू करण्यात येत आहे. तीन महिन्यात हे काम पूर्ण केले जाणार आहे. या प्रकल्पाकरीता महापालिकेस सुरवातीस कोणताही खर्च करावा लागणार नाही.

प्रकल्पासाठी एकूण अंदाजे 40 कोटी खर्च अपेक्षित आहे. बसविण्यात येणा-या दिव्यांच्या वॅटेज व संख्येनुसार सर्व करासह येणा-या खर्चाच्या एकूण रकमेनुसार 84 हप्त्यामध्ये महापालिकेकडून प्रत्येक महिन्याला ईईएसएल यांना अंदाजे 50 लाख एवढे बील रक्कम अदा करण्यात येणार आहे.

या कामामुळे महापालिकेच्या सर्व रस्त्यावर उर्जा बचत करणारे फक्त एलईडी दिवे असणार आहेत, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.