Pimpri news: पवना गोळीबारातील जखमी 12 शेतकऱ्यांच्या वारसांना महापालिका सेवेत घेणार

एमपीसी न्यूज – पवना बंद जलवाहिनीला विरोध करताना पोलीस गोळीबारात जखमी झालेल्या 12 शेतकऱ्यांच्या वारसांना, नातेवाईकांना पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेत घेण्यात येणार आहे. याबाबतची उपसूचना स्थायी समितीने दाखल करून घेतली आहे. महासभेने जरी हा प्रस्ताव मंजूर केला. तरी, अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे जावा लागणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याच्या प्रकल्पाचे काम 2008 मध्ये सुरु केले होते. या प्रकल्पाला मावळातील नागरिकांनी कडाडून विरोध केला. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रकल्पाविरोधात 9 ऑगस्ट 2011 रोजी झालेल्या आंदोलनावेळी गोळीबारात तीन शेतक-यांच्या दुर्देवी मृत्यू झाला.

या गोळीबारात कांताबाई ठाकर, मोरेश्वर साठे, श्यामराव तुपे या तीन शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे 10 ऑगस्ट 2011 रोजी परिस्थिती अबाधित ठेवण्यासाठी काम बंद करण्यात आले आहे. तेव्हापासून काम बंद आहे.

गोळीबारात मृत्यू झालेले मृतांचे वारसदार नितीन ठाकर, अक्षय साठे आणि हौसाबाई तुपे यांची अनुक्रमे शिपाई आणि मजूर म्हणून 2015 मध्ये महापालिका सेवेत नियुक्ती करण्यात आली आहे.

पवना धरण पाईप लाईन टाकण्याच्या आंदोलनाच्या गोळीबारात जखमी झालेल्या 12 शेतकऱ्यांच्या वारसांना, नातेवाईकांना महापालिका सेवेत घेण्याची उपसूचना स्थायी समितीने मांडली आहे. योगेश तुपे, शिवाजी वरवे, अमित दळवी, विशाल राऊत, गणेश चौधरी, नवनाथ गराडे, गणेश तरस, तुकाराम दळवी, अनिकेत खिरीड, गोरक्षनाथ वरघडे, गणपत पवार आणि सुरेखा कुडे या 12 जणांना महापालिका सेवेत घेण्याची उपसूचना मांडली आहे.

मान्यतेसाठी महापालिका सभेकडे शिफारस केली आहे. महासभेनंतर राज्य सरकारची अंतिम मान्यता घ्यावी लागणार आहे.

दरम्यान, राज्यात भाजपची सत्ता असताना व महापालिकेत मागील साडेचार वर्षांपासून सत्ता असताना याबतचा ठराव का केला नाही, सत्ताधाऱ्यांना उशिरा जाग आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.