Pimpri news: प्रभाग समिती, विषय समिती सभापतीपदाची निवडणूक न लढविणा-या राष्ट्रवादीची उपमहापौरपदाच्या निवडणुकीत उडी

एमपीसी न्यूज – संख्याबळ नसल्याचे आणि कोरोनाचे कारण देत नुकत्याच झालेल्या प्रभाग समिती, विषय समिती सभापतीपदाची निवडणूक न लढविणाऱ्या विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसने आता उपमहापौरपदाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे. राष्ट्रवादीकडून पिंपरीगावातील निकिता कदम यांचा उपमहापौरपदासाठी आज (सोमवारी) अर्ज दाखल करण्यात आला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रिक्त झालेल्या उपमहापौरपदासाठी सत्ताधारी भाजपकडून मोरवाडीचे प्रतिनिधित्व करणारे केशव घोळवे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. पालिकेत भाजपचे बहूमत असल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे.

तर, विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून निकिता कदम यांचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, राजू बनसोडे, स्वीकृत नगरसेवक भाऊसाहेब भोईर, फजल शेख उपस्थित होते.

महापालिकेच्या प्रभाग समिती, विषय समिती सभापतीपदाची निवडणूक नुकतीच झाली. प्रभागात आणि विषय समितीत भाजपचे वर्चस्व आहे. शहरात कोरोनाची परिस्थिती आहे. त्यामुळे निवडणूक लढविली नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसने बिनविरोध निवडी होऊ दिल्या.

आताही संख्याबळ नसताना आणि कोरोनाची परिस्थिती असताना राष्ट्रवादी काँग्रेसने उपमहापौर पदाच्या निवडणुकीत उडी घेतली आहे.

दरम्यान, 6 नोव्हेंबर 2020 रोजी उपमहापौरपदासाठी प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे. महापालिकेतील यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी अकरा वाजता विशेष सभेत ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे. पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पाहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.