Pimpri News : शहरात आजपासून 80 ठिकाणी ‘पे अँड पार्क’; ‘असे’ आहेत दर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत शहरातील वाहन पार्किंग धोरणाच्या पहिल्या टप्प्यातील अंमलबजावणीला आजपासून प्रारंभ झाला. शहरात 450 पे अँड पार्कची ठिकाणे आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे 80 जागांचा समावेश आहे. पार्किंगचे संचालन अपंग मुली  करीत  असून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते या अंमलबजावणीचा शुभारंभ करण्यात आला. पिंपरी येथील सिट्रस हॉटेल समोरील जागेत सशुल्क वाहनतळ करण्यात आले आहे. या ठिकाणी कार्यक्रमाचे औपचारीक आयोजन करण्यात आले होते.

आयुक्त राजेश पाटील, उपमहापौर हिराबाई घुले, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता प्रमोद ओंभासे, बापु गायकवाड आदी उपस्थित होते.

वाहनतळाच्या ठिकाणी महापौर ढोरे आणि आयुक्त पाटील यांनी शुल्क भरुन आपले वाहन पार्क करुन वाहन पार्कींग धोरणाचा शुभारंभ केला.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य बीआरटीएस विभागामार्फत शहरातील पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी करण्याबाबतची कार्यवाही सुरु झाली आहे. यात 13 मुख्य रस्ते व उड्डाणपुलाखालील काही जागांचा समावेश असून त्यामध्ये एकुण 450 पे अँड पार्कची ठिकाणे आहेत.

यातील सुमारे 80 जागांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे. शहरातील पार्किंग पॉलिसीची अंमलबजावणी करण्यासाठी निर्मला ऑटो क्रेन सेंटर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिक व वाहन चालकांच्या माहितीस्तव शहरातील पार्किंग ठिकाणांची यादी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. नो पार्किंग ठिकाणांची यादी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय (वाहतुक विभाग) प्रसिध्द करणार आहे.

‘ही’ आहेत पार्किंग ठिकाणे !

भक्ती शक्ती उड्डाणपुलाखाली आणि जवळचा परिसर, निगडी उड्डाण पुल (कै. मधुकर पवळे उड्डाण पुलाखाली आणि जवळचा परिसर), जुना मुंबई पुणे रस्ता आकुर्डी खंडोबा माळच्या जवळचा परिसर, चिंचवड स्टेशन आय आर बी एल बॅक आणि मुंबई सिलेक्षण, एम्पायर इस्टेट उड्डाणपूल खाली, पिंपरी-फिनोलेक्स चौक चा परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक, जुना मुंबई पुणे रस्ता नाशिक फाटा कासारवाडी खराळवाडी आणि दापोडी, चिंचवड स्टेशन ते के. एस. बी. चौक, निगडी ते बीग इंडिया (सावली हॉटेल), भक्ती शक्ती चौक ते वाल्हेकरवाडी दरम्यानचे भेळ चौक, एचडीएफसी बॅक, छत्रपती संभाजी महाराज चौक, वाल्हेकरवाडी,

निगडी ते भोसरी दरम्यानचे थरमॅक्स चौक, एचडीएफसी कॉलनी, गवळी माथा विजय सेल्स, हिंजेवाडी ते चिंचवड स्टेशन दरम्यानचे डांगे चौक, चापेकर चौक स्मार्ट पार्किंग, चापेकर चौक ते लोकमान्य हॉस्पीटल, आकुर्डी रेल्वे स्टेशन चे समोरील आणि मागील गेट आणि रेल्वे स्टेशन जवळचे रस्ते, काळेवाडी फाटा ते एम्पायर इस्टेट (उड्डाणपूल चालू होईपर्यंत), नाशिक फाटा ते वाकड (कोकणे चौक आणि शिवार चौक चा परिसर)

‘असे’ आहेत प्रती तासाचे पार्किंगचे दर !

दुचाकी, रिक्षा 5 रुपये, चारचाकी 10 रुपये, टेम्पो/चारचाकी मिनी ट्रक 15 रुपये, मिनी बस 25 रुपये, खाजगी बस आणि ट्रक / ट्रेलरला एका तासासाठी 100 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.