Pimpri News: स्मार्ट सिटीतील कामांची उच्चस्तरीय चौकशी करा,  खासदार बारणे यांची संसदेत मागणी

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटीतील अनेक कामे एकाच कंपनीला मिळत आहेत. सल्लागार एजन्सी ठेकेदारांना लाभ देण्याचे काम करत आहे. यामुळे केंद्र, राज्य सरकार आणि महापालिकेचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. शहरातील स्मार्ट सिटीचे काम केवळ दिखावा असून स्मार्ट सिटीअंतर्गत चालू असलेल्या सर्व कामांची  उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (शनिवारी) संसदेत केली.

या विषयावर लोकसभेत बोलताना खासदार बारणे म्हणाले, देशभरातील प्रमुख शहरात स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत काम चालू आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील पिंपरी-चिंचवड शहरातही स्मार्ट सिटीअंतर्गत काम चालू आहे.

यासाठी ज्या सल्लागार संस्थेची नियुक्ती केली आहे. ती संस्था ठेकेदारांशी मिलीभगत करुन प्रस्ताव तयार करत  आहे. ही एजन्सी सरळसरळ ठेकेदारांना लाभ देण्याचे काम करत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. यामुळे केंद्र, राज्य सरकार आणि महापालिकेचे मोठे नुकसान होत आहे.

स्मार्ट सिटीतील अनेक कामे एकाच कंपनीला मिळत आहेत. मूळ ठेकेदार सब ठेकेदारांना काम देतो. त्यामुळे कामाचा दर्जा राहत नाही नसून यात मोठा भ्रष्टाचार होत आहे. शहरात स्मार्ट सिटीचा केवळ दिखावा सुरु आहे. चमकदार असे एकही काम झाले नाही.

त्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत चालू असलेल्या कामाची उच्चस्तरीय चौकशी करावी. जे चुकीचे काम आहे, त्याची सखोल चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी खासदार बारणे यांनी संसदेत बोलताना  केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.