Pimpri News : जनतेचा जाहीरनामा ; शहरातील सुविधा, असुविधांबाबत नोंदवा तुमचे मत

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक जवळ आली आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. थोड्याच दिवसात राजकिय पक्षांचे जाहीरनामे प्रसिद्ध होतील. त्यात जनतेच्या मतांचा कितपत विचार केलेला असतो हा प्रश्नच आहे. नागरिकांना आपली मते मांडता यावी यासाठी ‘जनतेचा जाहीरनामा’ हा उपक्रम एका सामाजिक संस्थेने हाती घेतला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूकीत राजकीय पक्ष जेव्हा जाहीरनामा प्रसिद्ध करतात. त्यात रस्ते, वीज, पाणी याच बाबींवरती भर दिला जातो. या गोष्टी महत्वाच्या आहेतच मात्र, शहराची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने सुरू आहे. त्यासोबत शहरातील समस्या देखील वाढल्या आहेत. लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे लोकांनीच आपल्या समस्या, अडचणी, हव्या असलेल्या सुविधा, होणा-या असुविधा याबाबत मते मांडावीत यासाठी ‘जनतेचा जाहीरनामा’ हा उपक्रम सूरू करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम यांच्या वतीने हा उपक्रम राबविला जात आहे. नागरिकांना ऑनलाईन गुगल फॉर्मच्या मदतीने आपली मते नोंदवता येतील. गुगल फॉर्म मध्ये स्वत:ची माहिती भरून त्यामध्ये दिलेल्या चौकटीमधील 24 पर्यायापैकी आपल्याला मत मांडायचे असलेल्या एका पर्यायावर क्लिक करून आपली भूमिका मांडायची आहे. यामध्ये सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्था, उद्योग, पर्यावरण, रस्ते, वाहतूक, शिक्षण, क्रिडा, आरोग्य, कला यासारख्या विषयांचा समावेश आहे. एकापेक्षा अधिक विषयांवर देखील मत मांडता येऊ शकेल.

नागरिकांनी व्यक्त केलेली मते, मांडलेल्या भूमिका यांचा एकत्रित संचय करून आगामी निवडणूकीच्या पूर्वी राजकिय पक्ष, पालिका महापौर, पालिका आयुक्त यांच्याकडे हा जाहीरनामा दिला जाणार आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ मंडळींची देखील मते नोंदवली जाणार असल्याचे PCCF च्या वतीने सांगण्यात आले .

‘जनतेचा जाहीरनामा’मध्ये तुमचं मतं नोंदविण्यासाठी खालील गुगल फॉर्मवर भरा

https://surveyheart.com/form/61da70b728821d18acb09cff

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.