Pune News : पुणे प्रादेशिक विभागात एकाच दिवशी दोन कोटींच्या वीजचोऱ्या उघडकीस

एमपीसी न्यूज – पुणे प्रादेशिक विभागात वीजचोरांविरुद्ध महावितरणने कठोर कारवाई सुरु केली असून चौथ्या एकदिवसीय विशेष मोहिमेत 1 हजार 445 ठिकाणी 2 कोटी 7 लाख 13 हजार रुपयांच्या वीजचोऱ्या व अनधिकृत वीजवापर उघडकीस आणला आहे. वीजचोरीविरुद्धच्या नियमित कारवाई सोबत आतापर्यंत एकूण चार एकदिवसीय विशेष मोहिमेत 6 हजार 428  ठिकाणी 7 कोटी 71 लाख 45 हजार रुपयांच्या अनधिकृत वीजवापराचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

पुणे प्रादेशिक विभागात शनिवारी (दि.08) सकाळी 9 वाजता पाचही जिल्ह्यांमध्ये घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदी वीजजोडण्यांची तपासणी सुरु झाली. दिवसभरात 12 हजार 410 वीज जोडण्यांच्या तपासणीमध्ये 1,445 ठिकाणी वीजचोरी व विजेचा अनधिकृत वापर सुरु असल्याचे आढळून आले. यामध्ये सुमारे 14 लाख 60 हजार 580 युनिटची म्हणजे 2 कोटी 7 लाख 13 हजार रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर झाल्याचे स्पष्ट झाले. संबंधितांना चोरी केलेल्या युनिट व दंडाचे वीजबिल देण्यात येत आहे. हे वीजबिल व दंड भरला नाही तर फौजदारी कारवाई करण्यात येत आहे.

या विशेष मोहिमेत पुणे जिल्ह्यात 551 ठिकाणी 1 कोटी 62 लाख 32 हजार, सातारा- 123 ठिकाणी 9 लाख 81 हजार, सोलापूर- 670 ठिकाणी 22 लाख 48 हजार, कोल्हापूर- 41 ठिकाणी 6 लाख 15 हजार आणि सांगली जिल्ह्यात 60 ठिकाणी 6 लाख 80 हजार रुपयांच्या विजेचा अनधिकृत वापर उघड झाला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.