Pimpri News: युक्रेन देशात शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी, नागरिकांचा अहवाल सादर करा

अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांचे महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

एमपीसी न्यूज – रशिया व युक्रेन या देशात सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभुमीवर युक्रेन या देशात शिक्षण व इतर कामासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थी, नागरिकांना त्वरित भारतात आणणेबाबत भारत सरकार द्वारा “ऑपरेशन गंगा” अभियान सुरु करण्यात आलेले आहे. या अभियानांतर्गत भारतात काही विद्यार्थी, नागरिक यांना सुरक्षित परत आणण्यात आले असून काही प्रमाणात लोक युद्धग्रस्त देशात अडकून पडलेले आहेत. या विद्यार्थी, नागरिकांना देशात परत आणण्यासाठी युद्धस्तरावर उपाययोजना सुरु आहेत. त्या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयानुसार युक्रेनमध्ये अडकलेल्या शहरातील विद्यार्थी व नागरिकांची माहिती संकलित करून प्रशासनाकडे दोन दिवसात अहवाल सादर करा, असे आदेश अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी क्षेत्रीय कार्यालयांना दिले आहेत.

आपत्ती व्यवस्थापन कक्ष (मंत्रालय), महाराष्ट्र राज्य यांचे द्वारा जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांना प्राप्त अद्ययावत यादीनुसार पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील काही विद्यार्थी, नागरिक सदर युद्धग्रस्त देशात शिक्षणाकरिता गेलेले आहेत. यापैकी काही भारतीय विद्यार्थी, नागरिक भारत सरकार द्वारा “ऑपरेशन गंगा” अभियानांतर्गत आपल्या घरी परत आले आहेत. तसेच, काही नागरिक शेजारील देशात, आपले नातेवाईकांकडे सुरक्षित स्थलांतरीत झालेले आहेत, तर अजून काही नागरिक अद्याप भारतात परतलेले नाहीत. अशा नागरिकांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांचेकडून प्राप्त झालेली आहे.

या सर्व विद्यार्थी, नागरिक यांचे पालक अद्याप मानसिक तणावाखाली आहेत. सदर नागरिकांची माहिती घेवून क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येत असलेल्या विद्यार्थी, नागरिकांच्या घरी तातडीने क्षेत्रीय अधिकारी यांनी समक्ष जाऊन त्यांना मानसिक आधार व आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करावी. तसेच, सदर कार्यवाहीचा अहवाल पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त यांचेकडे दोन दिवसांत सादर करून याची प्रत अतिरिक्त आयुक्त (1) आणि आपत्ती व्यवस्थापन विभागास सादर करण्यात यावी, असेही आदेशात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.