Pimpri news: मृत वीज कंत्राटी कामगाराच्या पत्नीला मिळाला 10 लाखाच्या विमा सुरक्षा कवचाचा लाभ

एमपीसी न्यूज – अत्यावश्यक सेवेत येत असलेल्या कंत्राटी वीज कर्मचाऱ्याबाबत दुर्दैवी घटना घडल्यानंतर त्यांचे कुटुंब उघड्यावर पडते. नुकसान भरपाई देण्यासाठी सरकारकडून टाळाटाळ होत असल्याने महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने वेलफेअर फंडांची स्थापना केली आणि सदस्यांसाठी 10 लाख रुपयांची अपघात विमा योजना सुरू केली. संगमनेर तालुक्यातील अपघाती निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या पत्नीला या योजनेतून 10 लाखाच्या विमा सुरक्षा कवचाचा लाभ मिळाला आहे.

वीज उद्योग हा अत्यावश्यक सेवा आहे. कोरोना काळात वीज कंत्राटी कामगारांनी सर्व प्रकारचे धोके पत्करून अखंडित सेवा बजावली. या धोकादायक वीज उद्योगात काम करत जनतेला अखंडित व सुरळीत वीज सेवा देताना राज्यभरात मागील वर्षी तब्बल 40 कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाला.

अपघात झाल्यानंतर संबंधित कंत्राटदार व प्रशासन कोणतीच जबाबदारी घेत नाही. नुकसान भरपाई देण्यासाठी टाळाटाळ होते. त्यामुळे संबंधित कुटुंब उघड्यावर पडते. शासनाकडून कोणतीच आर्थिक मदत या कामगारांना न दिल्याने कामगाराच्या कुटुंबाची आर्थिक हेळसांड झाली. दुर्दैवाने नेहमीच असेच घडते.

त्यामुळे भारतीय मजदूर संघ संलग्न असलेल्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने पुढाकार घेऊन संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक अण्णा देसाई यांच्या संकल्पनेतून 1 जुलै 2020 रोजी वेलफेअर फंडांची स्थापना केली. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्याने संघटनेच्या सदस्यांसाठी 10 लाख रुपयांची अपघात विमा योजना सुरू केली.

या योजनेत कंत्राटी कर्मचारी सोपान कुलाळ यांनी सहभाग घेतला होता. 21 सप्टेंबर 2020 रोजी संगमनेर तालुक्यातील सोपान कुलाळ यांचे घारगाव शाखेतील कर्जुले पठार येथील वीज उपकेंद्रात अपघाती निधन झाले होते.

त्यांनी या विमा योजनेत सहभाग घेतला होता. त्यामुळे त्यांची पत्नी प्रियंका कुलाळ यांना आज महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ वेल्फेअर फंडांच्या वतीने 10 लाखाचा अपघात विम्याचा धनादेश देण्यात आला. तसेच संघटना कामगाराच्या कुटुंबीय ना कायदेशीर हक्क, पेंशन करिता प्रयत्नशील आहे.

याप्रसंगी संघटनेचे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, संघटनमंत्री राहुल बोडके, शरद मते, रामदास खराडे, सागर अहिनवे उपस्थित होते. ओरिएंटल इन्शुरन्सच्या शाखा प्रमुख सुनीता भुरेवार, विजय अहिवळे, महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे अध्यक्ष नीलेश खरात , कोषाध्यक्ष सागर पवार, कार्याध्यक्ष उमेश आणेराव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.