Pimpri News : पर्यावरण दिनानिमित्त शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – दरवर्षी 5 जून हा दिवस पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे हा पर्यावरण दिन साजरा करण्या मागचा हेतू आहे. पिंपरी-चिंचवड शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करुन जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.

आमदार जगताप यांचा पिंपळ-चिंच-वड अशा 5 हजार वृक्षांच्या लागवडीचा संकल्प

आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ गार्डन येथे वृक्षारोपण करण्यात आले. देशात वृक्षांच्या नावाने लौकिक असलेले पिंपरी-चिंचवड हे एकमेव शहर आहे. शहराच्या नावाप्रमाणेच पिंपळ-चिंच-आणि वड या देशी 5 हजार वृक्षांची लागवड करण्याचा संकल्प त्यांनी केला.

नगरसेवक शशिकांत कदम, सागर आंगोळकर, संजय गांधी निराधार योजना समितीचे संजय मराठे, नवीन लायगुडे, मारुती तरटे, महापालिकेचे उपायुक्त, उद्यान विभागाचे प्रमुख सुभाष इंगळे, स्थापत्य विभागाचे उपअभियंता चंद्रकांत मोरे, राहुल पाटील उपस्थित होते.

पिंपळे सौदागर येथे वृक्षारोपण

माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्या हस्ते प्रभाग 28 पिंपळे सौदागर येथील शिवसाई रस्ता येथे वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी शिवसाई रोडवरील सोसायटीचे चेअरमन सेक्रटरी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. “कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे जगात ऑक्सिजन अभावी कित्येक लोकांना प्राण गमवावे लागले. त्यामुळे सर्वांनी झाडे लावून त्याचे जतन करावे असे काटे म्हणाले.

संभाजीनगर येथे भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे यांच्या हस्ते वृक्षारोपण

संभाजीनगर येथे भाजपा प्रदेश सचिव अमित गोरखे, नगरसेविका अनुराधा गोरखे यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. ”दिवसेंदिवस पर्यावरणाचे संतुलन बिघडत असून जागतिक तापमानवाढीमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. वृक्ष संतुलन राखले जावे. पर्यावरण जोपासावे. यासाठी संपूर्ण पिंपरी-चिंचवड मतदार संघात भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रत्येक गावात वृक्षारोपण मोहिम राबविली जात आहे.

गेल्या एक ते दीड वर्षापासून संपूर्ण जगासह राज्यातही कोरोनाने थैमान घातलेले असून कोरोनाच्या दुस-या लाटेत अनेक रुग्णांना प्राणवायूची गरज भासली होती. त्याचा विचार करुन संपूर्ण मानव जातीने नैसर्गिक संपत्ती जोपासणे गरजेचे आहे. याकरीता वृक्ष संवर्धन ही काळाची खरी गरज आहे. त्यामुळे येणा-या पिढीसाठी आपण निश्चितच योगदान देऊ शकतो. या भावनेने उपक्रमामध्ये सर्वांनींच सहभागी व्हावे असे आवाहन गोरखे यांनी केले.

फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे एमआयडीसीत वृक्षारोपण

फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनतर्फे उद्योजकांनी एमआयडीसी मध्ये अनेक ठिकाणी वृक्षारोपण केले. वर्षभराच्या काळामध्ये 21 हजार वृक्ष लावण्याचे संकल्प उद्योजकांनी केला. कंपनीतील उद्योजकाने झाडे दत्तक घेण्याचे अभियान सुरू केले असून लवकरच एमआयडीसी परिसरात आणि शहरात अनेक ठिकाणी याचे नियोजन करण्यात येणार असल्याचे फोरमचे अध्यक्ष अभय भोर यांनी सांगितले. इंडस्ट्रीचे जसविंदर सिंग, वैभव जगताप, जोशी, सोनू ओहरी, विवेक जकाते, गणेश रोठे, गुरुराज माळी, ज्ञानेश्वर निकम उपस्थित होते.

कुदळवाडीत रोपांचे वाटप

स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव यांच्यावतीने विविध रोपांचे वाटप करण्यात आले. त्यात गुलमोहर, बदाम, कडुनिंब, जांभूळ, आवळा, अशोक, निलगिरी अशा अनेक वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी काका शेळके, मुरलीधर ठाकूर, अमर लोंढे, कुमार होले, ओमकार पवार, रंगनाथ जरे, दिनेश यादव, नितीन ईंदलकर, आकाश शर्मा आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.