Pimpri News: इंग्लंडहून आलेल्या दोन रुग्णांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन नाही, ‘एनआयव्ही’चा रिपोर्ट

80 नवीन रुग्णांची नोंद; 75 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज – इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या पिंपरी-चिंचवड शहरातील 268 प्रवाशांचा शोध घेण्यात आला आहे. त्यापैकी पॉझिटीव्ह असलेल्या सात प्रवाशांचे नमुने राष्ट्रीय विषाणू संस्थेला (एनआयव्ही) कडे यूके स्ट्रेन करीता जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठविले होते. त्यात दोघांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. म्हणजेच त्यांना कोरोनाचा नव्या स्ट्रेनची लागण झालेली नाही. जुनाच कोरोना आहे. तर, पाच जणांचे अहवाल प्रलंबित आहेत.

पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 75 आणि महापालिका हद्दीबाहेरील 5 अशा 80 नवीन रुग्णांची आज (सोमवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 75 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील तीन आणि महापालिका हद्दीबाहेरील एक अशा चार जणांचा आज मृत्यू झाला. त्यात प्राधिकरणातील 76 वर्षीय पुरुष, भोसरीतील 80 वर्षीय महिला, चिंचवड येथील 68 वर्षीय महिला आणि शिरोली बुद्रुक येथील 55 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत 97 हजार 35 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 93 हजार 667 जण बरे होऊन घरी गेले आहेत. शहरातील 1762 जणांचा तर शहराबाहेरील परंतू महापालिका रूग्णालयात उपचार घेणार्‍या 734 अशा 2496 जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सध्या 653 सक्रीय रूग्णांवर पालिका रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. तर, 1618 जणांचे चाचणी अहवाल प्रतिक्षेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.