Pimpri News : स्मशानभूमीतील झाडांची साजरी झाली अनोखी दिवाळी

एमपीसी न्यूज – स्मशानभूमी म्हंटल की दु:ख आणि वैराग्य या भावना मनात दाटून येतात परंतु, पिंपळे गुरव येथील स्मशानभूमीतील झाडांची आकर्षक रंगरंगोटी करून, आकाशकंदील आणि पणत्या प्रज्वलित करून अनोख्या पद्धतीने झाडांची दिवाळी साजरी करण्यात आली. दिलासा संस्था, प्रतिभा महिला प्रतिष्ठान आणि सावित्रीच्या लेकींचा मंच या तीन संस्थांनी एकत्र येऊन सोमवारी (दि.9) रोजी हा अभिनव उपक्रम राबवला.

याप्रसंगी महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, पिंपरी-चिंचवड महापालिका ड प्रभाग अध्यक्ष सागर अंगोळकर, नगरसेविका चंदा लोखंडे, ह.भ.प. शारदा मुंडे, ज्येष्ठ कवयित्री शोभा जोशी, मधुश्री ओव्हाळ, सामाजिक कार्यकर्त्या मीरा कंक हे उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र मगदूम यांना आदरांजली वाहण्यात आली. सावित्रीच्या लेकींचा मंच या संस्थेच्या अध्यक्ष रविना अंगोळकर यांनी प्रास्ताविक केले. उपस्थितांनी पक्ष्यांना धान्याचे दाणे टाकून कृतज्ञता व्यक्त केली. त्यानंतर स्मशानभूमीत कार्यरत असलेल्या स्वप्निल खाडे, दिलीप शंकरपाळे, वसंत चव्हाण, विठ्ठल देवकर या कर्मचाऱ्यांना सुरेश कंक लिखित ‘झाड बोलाया लागले’ हे पुस्तक देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी झालेल्या छोटेखानी कविसंमेलन पार पडले. यामध्ये आयके शेख, संगीता झिंजुरके, फुलवती जगताप, तानाजी एकोंडे, विजया नागटिळक या कवींनी सहभाग घेतला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे पुरुषोत्तम सदाफुले आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सागर अंगोळकर यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या संयोजनात सुभाष चव्हाण, निशिकांत गुमास्ते, रामचंद्र प्रधान, शरद काणेकर, प्रदीप गांधलीकर यांनी सहकार्य केले. दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी सूत्रसंचालन केले तर, शामराव सरकाळे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.