Pimpri News: पंतप्रधान आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करायचाय? ही आहे त्यासाठीची ‘लिंक’

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत असून 15 ऑगस्टपासून नागरिकांना ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यास सुरूवात झाली आहे. च-होली, बो-हाडेवस्ती, रावेत येथे 3 हजार 664 घरे उपलब्ध होणार आहेत. या योजनेसाठी पूर्वी अर्ज केलेल्यांनी तसेच नवीन अर्ज करावयाचा आहे त्यांनी http://103.224.247.133:8080/PMAY/#Again-No-back-button ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या लिंकवर क्लिक करावे.

याबाबतची माहिती महापौर उषा ढोरे आणि सभागृहनेते नामदेव ढाके यांनी नुकतीच पत्रकार परिषदेत दिली. आयुक्त श्रावण हर्डीकर, विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसे गटनेते सचिन चिखले, स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण, यशवंत भालकर आदी उपस्थित होते.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी गरीबी निर्मूलन मंत्रालयाच्या वतीने पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे. ’सर्वांसाठी घरे’ या उपक्रमाअंतर्गत महापालिका क्षेत्रात पंतप्रधान आवास योजना राबविण्यात येत आहे.

महापालिकेने या संदर्भातील ठराव 20 जून 2017 ला मंजूर केला होता. त्यानंतर च-होली, रावेत आणि बो-हाडेवस्ती येथे आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी घरे बांधण्याचे काम सुरू केले आहे.

शहरातील दहा ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेअंतर्ग घरे निर्माण होणार आहेत. त्यातील तीन ठिकाणचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत.

या योजनेत 30 चौरस मीटरचे घरकुल असून प्रत्येक प्रकल्पामध्ये 14 ते 15 मजली इमारत असणार आहे. घरकुलांसाठी लकी ड्रॉ काढण्यासाठी अर्ज प्रक्रिया करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.

पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलासाठी केंद्र शासनाकडून दीड लाख आणि राज्य शासनाकडून एक लाखांचे अनुदान मिळणार आहे. या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया स्वातंत्र्यदिनापासून सुरूवात होणार आहे. यास तीस दिवसांचा कालावधी निश्चित केला असल्याचे महापौर ढोरे यांनी सांगितले.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. त्यानंतर अर्जाची प्रिंट काढून नागरी सुविधा केंद्रामध्ये सादर करावी लागणार आहे.

त्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र, पॅनकार्ड, निवडणूक ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, वीज बील आणि पाच हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट भरणे आवश्यक असल्याचे सभागृह नेते ढाके यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.