Pimpri news: कोविड योद्धयांच्या हातावरुन शरीराचे तापमान, ह्रदयाची गती मोजता येणारे ‘स्मार्ट बँड’ !

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कोरोना योद्धा असणारे वैद्यकीय अधिकारी, वर्ग एकचे अधिकारी आणि नगरसेवकांना शरीराचे तापमान, ह्रदयाची गती, झोपेची गुणवत्ता आदी प्रक्रियांवर सहजपणे देखरेख ठेवण्यासाठी हातातील डिजीटल घड्याळाप्रमाणे असणारे ‘रिअल टाईम बॉडी टेम्परेचर मॉनिटरींग’ हे स्मार्ट बँड दिले आहेत. आयडीबीआय बँकेमामार्फत ‘सीएसआर’ अंतर्गत प्राप्त झालेल्या रकमेतून 350 नग खरेदी केले आहेत. त्यासाठी 10 लाख 50 हजार रूपये खर्च झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव सुरू होता. हा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या आहेत. त्याला यश येताना दिसून येत आहे. मागील पंधरा दिवसांपासून शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या घटली आहे.

रुग्णसंख्या पाचशेच्या आतमध्ये आली आहे. ही दिलासादायक बाब मानली जात आहे. परंतु, कोरोनाचे संकट टळले नाही. दसरा, दिवाळी या सणात विशेष काळजी घेण्याचे आवाहन पालिकेकडून केले जात आहे.

कोरोनाचा प्रादूर्भाव झालेल्या रूग्णांवर महापालिकेचे डॉक्टर आणि इतर वैद्यकीय अधिकारी, कर्मचा-यांमार्फत उपचार करण्यात येत आहेत. तसेच महापालिकेचे वर्ग एक आणि दोनचे अधिकारीही कोरोनाचा प्रत्यक्ष प्रादूर्भाव झालेल्या क्षेत्रात कामकाज करत आहेत.

कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांवर प्रत्यक्ष उपचार करणारे महापालिकेचे डॉक्टर आणि इतर वैद्यकीय कर्मचारी यांच्या जिवितास कोरोनाचा धोका उत्पन्न होण्याची दाट शक्यता असल्याने या कर्मचा-यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवणे आवश्यक आहे. ही देखरेख ठेवण्यासाठी आर्टीफिशीयल इंटेलिजन्सचा उपयोग करून घेणे शक्य होणार आहे.

यासाठी गोक्यी टेक्नॉलॉजीस प्रायव्हेट लिमिटेड यांनी तयार केलेला ‘रिअल टाईम बॉडी टेम्परेचर मॉनिटरींग स्मार्ट बँड’ चा वापर करण्याबाबत सुचविले होते. हा बँड एखाद्या व्यक्तीच्या हातातील डिजीटल घड्याळाप्रमाणे असून त्याद्वारे शरीराचे तापमान, हृदयाची गती, झोपेची गुणवत्ता आदी प्रक्रीयांवर सहजपणे देखरेख ठेवता येणे शक्य आहे.

या प्रक्रीयेत काही बदल झाल्यास या बँडद्वारे भ्रमणध्वनीला जोडता येते. त्याद्वारे संबंधित व्यक्तीच्या आरोग्याचा डॅशबोर्ड उपलब्ध होणार आहे. या डॅशबोर्डची उपलब्धता 12 महिने कालावधीसाठी मोफत आहे. या बँडची बाजारातील किंमत 3 हजार 799 रूपये प्रति बँड आहे.

महापालिकेकरिता 2 हजार 999 रूपये प्रति बँड या सवलतीच्या दरात हा बँड उपलब्ध करून दिला आहे. महापालिकेचे डॉक्टर आणि इतर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच वर्ग एकचे अधिकारी आणि नगरसेवक यांच्यासाठी ‘रिअल टाईम बॉडी टेम्परेचर मॉनिटरींग स्मार्ट बँड’चे एकूण 350 नग खरेदी केले आहेत.

 पालिकेचे माहिती व तंत्रज्ञान अधिकारी नीलकंठ पोमन म्हणाले, पालिकेने रिअल टाईम बॉडी टेम्परेचर मॉनिटरींग स्मार्ट बँड’ खरेदी केले आहेत. ‘सीएसआर’ अंतर्गत आलेल्या निधीतून त्याची खरेदी केली आहे. डॉक्टर, वर्ग एकचे अधिकारी, नगरसेवकांना देण्यात आले आहेत.

पालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे म्हणाले, स्मार्ट बँड’ नाविन्यपूर्ण, प्रयोगशील आहे. पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी यांना देण्याचे काम सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.