Pimpri News : विनापरवाना वृक्षतोड केल्यास आता 50 हजार रुपये दंड

प्राधिकरण समितीच्या बैठकीत ठराव मंजूर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात होणा-या विनापरवाना वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीने मोठा निर्णय घेतला आहे. विनापरवाना वृक्षतोड केल्यास 50 हजार रुपये दंडाची आकारणी केली जाणार आहे. विनापरवाना वृक्षतोडीचे छायाचित्र, व्हिडीओसह माहिती देणा-यालाही बक्षीस दिले जाणार आहे.

याबाबतचा ठराव शुक्रवारी (दि.9) झालेल्या समितीच्या बैठकीत मान्य करण्यात आला. यापूर्वी विनापरवाना वृक्षतोडल्यास केवळ 10 हजार रुपये दंड आकारला जात होता.

महापालिका वृक्ष प्राधिकरण समितीचे आयुक्त राजेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक झाली. समितीचे सदस्य नगरसेवक श्याम लांडे, शितल शिंदे, गोविंद पानसरे, संभाजी बारणे, अजिंक्य बारणे, हिरामण भुजबळ उपस्थित होते. मागील काही दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात विनापरवाना वृक्षतोडीचे प्रमाण वाढले आहे.

परवानगी घेतली जाते काही झाडे तोडण्याची प्रत्यक्षात मात्र अनेक मोठ्या झाडांची कत्तल केली जाते. अनेकदा छाटणीची परवानगी असते. प्रत्यक्षात बुंद्यापासून झाडे तोडली जात असल्याचे दिसून येत आहे. छाटणीच्या नावाखाली झाडांची कत्तल केली जात आहे. याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.

विनापरवाना वृक्षतोड केल्यास यापूर्वी 10 हजार रुपये दंड होता. त्यामध्ये वाढ करुन यापुढे विनापरवाना वृक्षतोड केल्यास 50 हजार रुपये दंडाची आकारणी केली जाणार आहे. विनापरवाना वृक्षतोडीचे छायाचित्र, व्हिडीओसह माहिती देणा-यालाही बक्षीस दिले जाणार आहे. त्याचे नाव गुप्त ठेवले जाणार आहे, याबाबतचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

उद्यान विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे म्हणाले, ”शहरात विनापरवाना वृक्षतोड केली जात होती. त्याला आळा बसणे गरजेचे आहे. त्यासाठी विनापरवाना वृक्षतोड केल्यास 50 हजार रुपये दंडाची रक्कम केली आहे. त्याचबरोबर अनामत रकमेमध्ये वाढ केली आहे. पूर्वी 4 हजार रुपये ठेवावी लागत होती. आता 10 हजार रुपये केली आहे.

अनधिकृत वृक्षतोडीला आळा बसण्यासाठी कठोर निर्णय घेतले आहे. विनापरवाना वृक्षतोडीची छायाचित्र, व्हिडीओसह माहिती देणा-याला बक्षीस दिले जाणार आहे. त्याची रक्कम ठरविली नाही. आयुक्त जी रक्कम निश्चित करतील. ती रक्कम दिली जाईल”.

समितीचे सदस्य गोविंद पानसरे म्हणाले, ”कृत्रिम ऑक्सिजन प्लांट उभे करण्याऐवजी मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन देणाऱ्या वनस्पतीची लागवड करावी. प्रभागवार ऑक्सिजन पार्कची उभारणी करावी. औद्योगिक विभागात उद्योजकांच्या सहभागातून आजूबाजूच्या मोकळ्या जागेवर, अतिक्रमणे वाढण्याच्याऐवजी वृक्षारोपणद्वारे सुशोभीकरण करावे. त्याची देखभाल संबंधित लघुउद्योगाकडे द्यावी, असे ठरावही बैठकीत मान्य झाले.

सध्या पावसाळा असल्यामुळे सर्व नागरिकांच्या सहभागातून सोसायट्या, मंडळे, शैक्षणिक संस्थाद्वारे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचे ठरले. यासाठी महापालिकेद्वारे मोफत वृक्षाचे वाटप करण्यात येणार आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.