Pimpri : महाराष्ट्र वनवासी कल्याण आश्रम, ‘गो-ग्रीन’ संस्था आणि पंढरीनाथ विद्यालयच्या वतीने माळीण येथे वृक्षारोपण

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र वनवासी कल्याण आश्रम (पिंपरी-चिंचवड शाखा), ‘गो-ग्रीन’ संस्था आणि पंढरीनाथ विद्यालय (आंबेगाव तालुका, जिल्हा – पुणे) यांनी एकत्रितपणे माळीण येथे रविवार (दि.21 जुलै) वृक्षारोपण केले. महाराष्ट्र वनवासी कल्याण आश्रमाचे मुख्य समन्वयक नरेंद्र पेंडसे, पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष सुरेश गुरव, सचिव विजय भालिंगे, सहसचिव नारायण ठिकडे, यशवंत भोंग, अरुण काठे, वैभव वाघमारे, गो-ग्रीन संस्थेचे प्रशांत भालेकर, आमडे येथील सरपंच आसवले, पंढरीनाथ विद्यालयाचे विश्वस्त ज्ञानेश्वर कोळप यांनी सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम राबवला.

पाच वर्षांपूर्वी 30 जुलै 2014 रोजी माळीण येथे नैसर्गिक आपत्तीमुळे डोंगरकडा कोसळून सुमारे 151 जण काळाच्या उदरात गडप झाली. दरम्यानच्या काळात माळीण गावाचे नव्या ठिकाणी पुनर्वसन झाले; परंतु या क्षेत्रातील विशिष्ट प्रकारची भुसभुशीत माती, डोंगरावरील माती धरून ठेवणाऱ्या झाडांची घटणारी संख्या यामुळे येथील पसारवाडीसारख्या काही मानवी वस्त्यांना असलेला धोका लक्षात घेऊन या संस्थांनी एकत्रित पुढाकार घेऊन पहिल्या टप्प्यात पुनर्वसन झालेल्या गावाच्या मागे डोंगरावरील पठारावर आणि डोंगर उतारावर 250 देशी रोपांचे रोपण केले. यामध्ये जांभूळ, वड, खैर, कांचन, बांबू, शिसम या प्रजातींचा समावेश होता.

  • डोंगरावरील पठारावर रोपे, खड्डे खोदण्याचे साहित्य, जैविक खतांची पोती, दोऱ्या इत्यादी साहित्य वाहून नेणे हेच खरे श्रमाचे काम होते; परंतु कल्याण आश्रमाचे 22 कार्यकर्ते, माळीण परिसरातील आरोग्यरक्षक, गो-ग्रीन संस्थेचे सदस्य, आंबेगाव तालुक्यातील पंढरीनाथ विद्यालयाचे 50 विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून पहिल्या टप्प्यातील हा वृक्षारोपणाचा उपक्रम यशस्वी झाला.

पुढील टप्प्यात अजून 225 रोपांचे रोपण आणि खेड तालुक्यातील नायफड येथे सुमारे 100 फळझाडे लावण्याचा मानस आहे. वृक्षारोपणाच्या वेळी डोंगर उतारावर खड्डे खोदणे, रोपाला आधार देण्यासाठी बांबूची काठी रोवणे, योग्य प्रमाणात खत-माती घालणे या गोष्टींचे उत्तम प्रशिक्षण गो-ग्रीनच्या प्रशांत भालेकर यांनी सहभागींना दिले.

  • पुढील काळात रोपांना पाणी देणे, भोवतालचे गवत काढणे, जनावरांपासून त्यांचे संरक्षण करणे यासाठी स्वयंसेवकांची आणि देणगीदारांची गरज असून इच्छुकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य समन्वयक नरेंद्र पेंडसे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.