Pimpri : सत्ताधारी भाजप अन्‌ प्रशासनाच्या ‘खाबुगिरीमुळे’ शहराचा कचरा – मारुती भापकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या पाच दिवसांपासून कचरा उचला गेला नाही. शहरातील कचराकुंड्या भरुन कुंड्याच्या आजूबाजुला कचरा साचला आहे. पाऊस सुरु असल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून त्यामुळे शहरवासियांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाच्या भ्रष्टाचाराच्या पापामुळेच शहरवासियांना नरक यातना भोगाव्या लागत आहे. सत्ताधारी भाजप अन्‌ प्रशासनाच्या ‘खाबुगिरी’मुळे शहराचा कचरा झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे.

शहरातील कचरा संकलन आणि वहनाच्या कामाची मुदत 2017 मध्ये संपुष्टात आली होती. तेव्हापासून महापालिकेतील भाजप पदाधिका-यांनी व प्रशासनाने आर्थिक गैरव्यवहार करुन निवेदा प्रक्रीयेला फाटा देत तब्बल नऊ वेळा संबंधित ठेकेदाराला मुदतवाढ दिली. त्यानंतर पुणे-मुंबई महामार्गाचा आधार घेत दोन भागात (दक्षिण व उत्तर भागात) विभाजन केले. त्याआधारे फेब्रुवारी 2018 ला दोन निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये कचरा वाहनाचा ठेका उत्तर भागासाठी बीव्हीजी. इंडिया लि. यांना तर ए.जी.एन्व्हायरो इंफ्रा यांना दक्षिण भागातील काम देण्यात आले. तत्कालीन स्थायी समिती व प्रशासनाने या दोन ठेकेदा-यांच्या निविदा आर्थिक लाभ घेऊन निविदा मंजूर केल्या. यावेळी या ठेकेदारालाच काम मिळावे म्हणून अटी शर्तीमध्ये बदल केले.

त्यानंतर निविदा रद्द, नवीन निविदेचा घोळ सुरु ठेवला. त्यातच ठेकेदाराने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाने महापालिकेला खडेबोल सुनावत पूर्वीच्या ठेकेदारांना ठेका देण्याचा आदेश दिला. त्यामध्ये दोन वर्षाचा काळ गेला. शहरातील कचरा निविदेच्या बाबत सन 2016-17 पासूनची स्थायी समिती, सत्ताधारी पक्ष, प्रशासन, ठेकेदार, सल्लागार यांनी संगणमत करुन सुनियोजित पध्दतीने सर्व यंत्रणाची दिशाभूल केली. कोट्यवधीचा गैरव्यवहार व भ्रष्टाचार करुन ही प्रक्रिया शहरावर लादली.

त्यामुळेच शहराचाच कचरा झाला आहे. शहरातील कचराकोंडी ही सत्ताधारी भाजपा व प्रशासनाच्या भ्रष्टाचाराचे पाप आहे. त्यामुळे कचरा कोंडीमुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यावर तत्काळ उपाययोजना कराव्यात. खाबूगिरी थांबवावी. अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा भापकर यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.