Pimpri: शहरातील एका गल्लीत पाच दुकानांनाच मिळणार परवानगी; क्षेत्रीय अधिकाऱ्यांची समिती गठीत

मॉल, व्यापारी संकुले, मार्केट लॉकडाऊन कालावधीत बंदच राहणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील प्रतिबंधीत क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्रामधील नागरी वसाहतीमधील अत्यावश्यक वस्तू व्यतिरिक्तची दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. एक रस्ता किंवा गल्ली मध्ये अशा प्रकारच्या जास्तीत जास्त पाच दुकानांनाच परवानगी देण्यात येईल. त्यासाठी प्रभाग स्तरावर क्षेत्रिय अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. परवानगी देताना मिठाई दुकान, बेकरी, हार्डवेअर दुकान, इलेक्ट्रीक दुकाने, चष्मा दुकाने, लहान मुलांचे कपड्याचे दुकान, इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल आणि गॅरेज असा प्राधान्यक्रम विचारात घेतला जाणार आहे. तर, मॉल,व्यापारी संकुले, मार्केट हे लॉकडाऊन कालावधीत बंदच राहणार आहेत.

शहरातील 21 कंन्टेन्मेंट झोन वगळता इतर क्षेत्रामध्ये दैनंदिन व्यवहार सुरळीत राहण्याच्या दृष्टीने जीवनावश्यक वस्तू व्यतिरिक्त इतर दुकानांना परवानगी देण्याचा निर्णय ही समिती घेणार आहे. या समितीमध्ये कार्यकारी अभियंता सह अध्यक्ष तर स्थापत्य विभागाचा उपअभियंता, कर निरिक्षक व बीट निरीक्षक यांचा समावेश असेल.

अशी असेल समितीची कार्यपध्दती
प्रत्येक दुकानात सोशल डिस्टन्सिंगची जबाबदारी दुकानदारांची राहील. त्यामध्ये संबंधित प्रभाग अधिका-यांनी वेळोवेळी पाहणी करावी. त्यात हयगय होताना आढळून आल्यास संबंधितांविरुध्द भारतीय दंड संहिता IPC188 अंतर्गत गुन्हा दाखल करणेत यावा. याची सूचना प्रभाग अधिका-यांनी संबंधित दुकानदारांना द्यावी असे आदेशात नमुद करणेत आलेले आहे.

अत्यावश्यक सेवा – दुध, भाजीपाला, फळे, किराणा दुकाने, सर्व प्रकारचे दवाखाने, इस्पितळे, क्लिनिक, प्रसुतीगृहे व औषधी दुकाने यांना परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. महापालिका क्षेत्रातील सर्व प्रकारचे मॉल,व्यापारी संकुले, मार्केट हे लॉकडाऊन कालावधीत बंदच राहणार आहेत.

प्रतिबंधीत क्षेत्र वगळता उर्वरित क्षेत्रामधील नागरी वसाहतीमधील अत्यावश्यक वस्तू व्यतिरिक्तची एकल दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्यात येईल. एक रस्ता किंवा गल्लीमध्ये अशा प्रकारच्या जास्तीत जास्त पाच दुकानांनाच परवानगी देता येईल. समितीने परवानगी देताना मिठाई दुकान, बेकरी, हार्डवेअर दुकान, इलेक्ट्रीक दुकाने, चष्मा दुकाने, लहान मुलांचे कपड्याचे दुकान, इलेक्ट्रॉनिक्स व मोबाईल आणि गॅरेज असा प्राधान्यक्रम विचारात घ्यावा.

गठीत केलेल्या समितीने निवडणूकीच्या प्रत्येक प्रभागाची रचना विचारात घेऊन प्रत्येक मुख्य रस्ता/चौक/गल्लीमध्ये वरील दुकानांना रोटेशनप्रमाणे आलेल्या अर्जाची छाननी करुन परवानगी देण्यात यावी. एकाच गल्लीत एकाच प्रकारच्या दुकानाकरीता अनेक अर्ज आलेस त्यांना सुध्दा रोटेशननुसार परवानगी देणेत यावी. निवडणूकीच्या एकाच प्रभागात अनेक मुख्य रस्ता/चौक/गल्लीमध्ये असतील तर ते सुध्दा रोटेशननूसार चालू राहतील.

या भागातील अत्यावश्यक सेवेतीलच दुकाने चालू राहणार
गठीत केलेल्या समितीने चिंचवड स्टेशन, पिंपरीकॅम्प, गांधीपेठ चाफेकर चौक, चिंचवड, काळेवाडी मेनरोड(एमएम स्कुल ते काळेवाडी नदीवरील पुल), अजमेरा पिंपरी, मोशी चौक, मोशी आळंदी रोड, महाराणा प्रताप चौक निगडी बसस्टॉप, साई चौक,शगुन चौक पिंपरी कॅम्प, डांगेचौक ते काळेवाडी फाटा, भोसरी आळंदी रोड, कावेरीनगर मार्केट, कस्तुरी मार्केट थरमॅक्स चौक ते साने चौक, दिघी जकात नाका ते मॅक्झीन चौक साईबाबा मंदिर, या ठिकाणी इतर अत्यावश्यक सामाना व्यतिरिक्तच्या दुकानांना परवानगी देण्यात येणार नाही. परंतू, या ठिकाणी पुर्वीप्रमाणे अत्यावश्यक सेवेमधील दुकाने चालू राहतील.

प्रतिबंधित क्षेत्रात सदर काळात सकाळी 10 ते दुपारी 12 या कालवधीतच दुध, भाजीपाला फळे यांची किरकोळ विक्री सुरु राहील. शहराच्या उर्वरीत भागात भाजीपाला व फळे विक्री ही सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत निश्चित केलेल्या जागांवरच सुरु ‍ राहिल. त्याव्यतीरिक्त उर्वरित कालावधी मध्ये विक्रीस प्रतिबंध राहील. घरपोच भाजीपाला व फळे विक्री ही मनपाच्या पूर्व मान्यतेनुसारच अनुज्ञेय करण्यात येईल.

प्रतिबंधित क्षेत्रात सदर काळात मटण व चिकन, अंडी यांची किरकोळ विक्री ही या पूर्वी मनपाने दिलेल्या आदेशानुसार सकाळी 10 ते दुपारी 12 या कालवधीतच सुरु राहिल. शहराच्या उर्वरीत भागात सदर विक्री ही या पूर्वी मनपाने दिलेल्या आदेशानुसार सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत सुरु राहील (बुधवार, शुक्रवार, रविवार).

जीवनावश्यक वस्तूंचे, औषधांचे व तयार अन्न पदार्थाचे घरपोच वाटप सकाळी 8 ते रात्री 10 या कालवधीतच मनपाच्या पूर्व मान्यतेने पास घेवून अनुज्ञेय राहिल. सदर सुविधेकरीता फक्त मनपाच्या अधिका-याव्दारे निर्गमीत करण्यात आलेला पास ग्राहय धरण्यात येईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.