Pimpri: व्यवसाय म्हणून राजकारण करणा-यांना जनता माफ करणार नाही – गिरीश बापट

महायुती मावळ लोकसभा मतदारसंघाच्या मध्यवर्ती कचेरीचे उदघाटन

एमपीसी न्यूज – काँग्रेस पक्षाने मागील पन्नास वर्षांपासून देशाला फसवलं आहे. त्यामुळे त्यांना मत मागायचा अधिकार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडे पैसा ही शक्ती तर महायुतीकडे प्रेम हे अस्त्र आहे. ज्यांचा राजकारण हा व्यवसाय आहे, त्यांना जनता माफ करणार नाही. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार निवडून येणार आहे, असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला.

शिवसेना, भाजप, रासप, आरपीआय (अ), रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम महायुतीच्या मध्यवर्ती कचेरीचे बुधवारी (दि. 10) पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते उदघाटन झाले.

  • मध्यवर्ती कचेरीच्या उदघाटनप्रसंगी पालकमंत्री बापट बोलत होते. यावेळी शिवसेना, भाजप, रासप, आरपीआय (अ), रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, खासदार अमर साबळे, भाजप शहराध्यक्ष, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, उमा खापरे, सदाशिव खाडे, जिल्हाध्यक्ष गजानन चिंचवडे, शहराध्यक्ष योगेश बाबर, उर्मिला काळभोर, सरिता साने, अमोल थोरात, आरपीआयच्या चांद्रकांता सोनकांबळे, बाळासाहेब रोकडे, लक्ष्मण गायकवाड, दयानंद वाघमारे, प्रकाश ओव्हाळ, के एम बुक्तर, अल्ताफ शेख, विनोद गायकवाड, बापू वाघमारे, दशरथ थानांबीर, प्रणव ओव्हाळ, शैलजा मोळक, शिवसंग्रामचे पांडुरंग मोळक पाटील, आशा शेडगे, शिवसेना-भाजप चे आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

मावळ लोकसभा मतदारसंघातून शिवसेना, भाजप, रासप, आरपीआय (अ), रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम महायुतीकडून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली आहे. खासदार बारणे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवारी (दि. 9) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरू झाली असून मावळ मतदारसंघात ठिकठिकाणी प्रचार कार्यालय सुरू करण्यात आली आहेत. तसेच पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाजवळ महायुतीची मध्यवर्ती कचेरी सुरू करण्यात आली आहे.

  • खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “अनेकांनी लक्ष्मण जगताप आणि मी एकत्र न येण्यासाठी देव पाण्यात ठेवले. पण देशहितासाठी आम्ही सर्व हेवेदावे विसरून आम्ही एकत्र आलो. मध्यवर्ती कार्यालयाच्या माध्यमातून प्रचारसाहित्य, आवश्यक सूचना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मिळतील. सर्वांनी मतदारसंघात फिरून काम करावे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देशपातळीवरून राज्य आणि आता राज्यपातळीवरून आता लोकसभा मतदारसंघापुरते उरले आहेत. नरेंद्र मोदी सरकारने देशभर भरीव काम केलं आहे. ते काम सर्वांपर्यंत पोहोचवणे ही आपली गरज आहे.”

पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, “महायुतीचा जोर प्रचार आणि प्रसारावर आहे. आपलं नेतृत्व कसं असावं हे जनता चांगल्या प्रकारे जाणते आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा उमेदवार जनतेवर लादला आहे. त्यामुळे मावळ मतदारसंघात जत्रा सुरू आहे. जत्रेत लोक जमतात. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे सगळे नेते आणि पदाधिकारी मावळ मतदारसंघात फिरत आहेत. राजकारण हे धंदा करण्याची आणि घराणेशाहीची गोष्ट नाही. राजकारण हे समाजकारण आणि त्यागावर उभं असतं.

  • राष्ट्रवादी काँग्रेस ही पार्टी नाही तर पवार घराण्याने चालवलेली कंपनी आहे. ही कंपनी दिवसेंदिवस बंद होत आहे. या पक्षाचे नेतृत्व करायला उमेदवारच नाही. आजोबा आणि वडिलांच्या पुण्याईवर जो निवडणूक वाढवतो तो उमेदवार समाज सुधारू शकत नाही. निवडणूक स्वबळावर, स्वकर्तृत्वावर लढवली पाहिजे. आपला महायुतीचा उमेदवार कार्यक्षम आहे. निवडणूक चुरशीची नाही तर चिकाटीची आहे. प्रत्यकाने आपलं काम प्रामाणिकपणे करायला हवं. नरेंद्र मोदी यांचे सरकार येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, यामुळे देशात पुन्हा एकदा नवा इतिहास रचला जाईल, असा विश्वास बापट यांनी व्यक्त केला.

खासदार अमर साबळे म्हणाले, “केंद्र सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून अनेक सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवल्या आहेत. दलालांची दलाली बंद झाल्याने त्यांची ओरड सुरू झाली आहे. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केवळ चर्चा न करता जनतेपर्यंत पोहोचून आपल्या उमेदवारांचे काम पोहोचवायला हवं.”

  • आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “माझ्या प्रचारात सहभागी होण्याआधीपासून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि वरिष्ठांनी देशहितासाठी दबाव आणला आणि आम्ही दोघेही झुकलो आणि एकत्र आलो. मागील पन्नास वर्षात झाला नाही एवढा विकास मागील पाच वर्षात झाला. महापालिकेच्या माध्यमातून देखील अनेक कामे झाली आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या मदतीसाठी पालकमंत्री आणि खासदारांनी यशस्वी प्रयत्न केले. पालकमंत्री बापट आणि खासदार बारणे या दोघांना निवडून देणे ही देशाची गरज आहे. प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतः उमेदवार असल्यासारखे काम करावे.”

आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार म्हणाले, “विजय सहज वाटत असला तरी आपण सर्वांनी तळागाळातील मतदारापर्यंत पोहोचले पाहिजे. कचेरीतून मिळालेल्या आदेशाचे पालन कार्यकर्त्यांनी करावे. नियोजन करून जनतेपर्यंत पोहोचायला हवं.”

  • चांद्रकांता सोनकांबळे म्हणाल्या, “मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचा विजय निश्चित झाला आहे. त्यासाठी कर्त्याकर्ते जोमाने काम करत आहेत.रिपब्लिकन पक्ष देखील सक्रियपणे काम करत आहे.”

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.