Pimpri: साथीच्या आजाराने शहरवासिय त्रस्त; डिसेंबर महिन्यात 53 रुग्णांना डेंग्यूची लागण

एमपीसी न्यूज – वातावरणातील बदलामुळे ताप, सर्दी, खोकला या आजारांनी पुन्हा डोके वर काढले आहे. डेंग्यूच्या रुग्णांमध्येही दिवसें-दिवस वाढ होत असून डिसेंबर महिन्यात 53 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर, जानेवारी महिन्यांपासून अद्यापपर्यंत 563 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली असल्याची, माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दर महिन्याला डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरात यंदा डेंग्यूच्या आजारांने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. शहरातील वाढत्या अस्वच्छतेमुळे कीटकजन्य आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये 4570 तापाचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये, 859 संशयित रुग्णांपैकी 218 बाधित रुग्ण आढळले आहेत. शहरामधील वाढत्या अस्वच्छतेमुळे कीटकजन्य आजारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यासाठी, शहरात विविध ठिकाणी तपासणी सुरु असून डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाय सुरु आहेत.

या आजाराचा प्रसार थांबविण्यासाठी डासांना आळा घालणे महत्त्वाचे आहे. आपल्या परिसरामध्ये डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तसेच, परिसरातील टायर, कुंड्या, पत्रे यासारख्या ठिकाणी पाणी साचल्यास आळ्या होण्याची शक्‍यता आहे. यामुळे, नागरिकांनी दक्षता घेण्याची आवश्‍यकता आहे. डेंग्यू व मलेरिया आजार आटोक्‍यात आणण्यासाठी महापालिका उपाययोजना करत असल्याचे, आरोग्य विभागाने सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.