Pimpri: पाणी सोडण्याच्यावेळी ‘डुलकी’; महापालिकेच्या तीन मजुरांची खातेनिहाय चौकशी

एमपीसी न्यूज – चिखली भागातील पाण्याच्या उंचावरील टाक्या भरुन घेण्याच्यावेळी रात्री झोपणे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयातील तीन मजुरांना चांगलेच महागात पडले आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्याचा आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिला आहे.

राजेंद्र बाळू मोरे, रविंद्र बाबुराव अहिरराव आणि आबाजी सीताराम कातोरे अशी कामाच्यावेळी रात्री झोपलेल्या तीन मजुरांची नावे आहेत. त्यांची खातेनिहाय चौकशी केली जाणार आहे. मोरे, अहिरराव आणि कातोरे हे तिघे महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रिय कार्यालयात मजूर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे पाणीपुरवठा विभागाअंतर्गत मोरे वस्ती, चिखली, त्रिवेणीनगर, मोहननगर या भागातील उंच टाकी भरुन घेण्याचे आणि ठरवून दिल्यावेळी टाक्यांचे व्हॉल्व्ह सोडण्याचे कामकाज सोपविण्यात आले आहे. या भागातील पाणीपुरवठा व्यवस्थितपणे व सुरक्षित होईल याची दक्षता घेण्याची तिघांची जबाबदारी, कर्तव्य आहे.

  • मोरे, अहिरराव आणि कातोरे हे तिघे कामाच्या ठिकाणी रात्री पाणी सोडण्याच्यावेळी झोपल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला. पाणीपुरवठा अपु-या दाबाने झाला. पाणीपुरवठा सुव्यवस्थित न झालेल्या भागातील नागरिकांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागले. गैरवर्तनाबाबत मोरे, अहिरराव आणि कातोरे हे तिघांना वारंवार समक्ष तोंडी सूचना दिल्या. प्रसंगी नोटीस बजावून देखील त्यांच्या वर्तणात सुधारणा झाली नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विषयक अत्यावश्यक सेवेच्या कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. ही बाब सहशहर अभियंत्यांनी निदर्शनास आणून दिली.

पवना धरणामध्ये पाणीसाठा अत्यल्प आहे. त्यामुळे सुनियोजित व व्यवस्थित पाण्याचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी पाण्याचे व्हॉल्व्ह वेळेत चालू करणे. टाकी पुर्ण भरल्यानंतर बंद करणे अंत्यत आवश्यक आहे. नागरिकांना पाणी पुरवठा सुरळित न झाल्यास नगरसेवक, नारिकांकडून वारंवार विचारणा होऊन तक्रारी येत असतात. यामुळे महापालिकेची जनमानसातील प्रतिमा मलिन होते.

  • मोरे, अहिरराव आणि कातोरे यांनी नेमून दिलेल्या कामकाजात कर्यव्यपरायनता न ठेवता, कामकाजामध्ये निष्काळजीपणा व हलगर्जीपणा केल्याचे सकृत दर्शनी दिसून येत आहे. पाणीपुरवठा सेवेशी निगडीत कामकाजात हलगर्जीपणा, पाणीपुरवठा विषयक अत्यावश्यक सेवेच्या कामकाजात सचोटी व कर्तव्यतत्परता न ठेवता कसूर केला आहे. त्यामुळे मोरे, अहिरराव आणि कातोरे या तिघांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आली आहे. या आदेशाची नोंद त्यांची सेवा पुस्तकात केली जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.