Pimpri : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी अखेर तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – बलात्कार केल्यानंतर अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याप्रकरणी आरोपीवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीने मृत बाळाला जन्म दिला. त्यामुळे हा सारा प्रकार उघडकीस आला. यामध्ये पीडितेच्या घरच्यांनी तक्रार देण्यास नकार दिल्याने पोलिसांनी फिर्यादी बनून गुन्हा दाखल केला आहे.

शाम शिंगाडे (रा. वचपे, ता. आंबेगाव जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात आंबेगाव येथील एका अल्पवयीन मुलीवर उपचार सुरु असताना तिने मृत बाळाला जन्म दिला. त्यावेळी तिच्यावर बलात्कार झाला असल्याचा आरोप पिंपरी-चिंचवड वूमेन हेल्पलाईनच्या महिला अत्याचार विरोधी समितीकडून करण्यात आला. मात्र मुलीच्या घरच्यांनी कोणतीही तक्रार देण्यास नकार देत मृत बाळाची परस्पर विल्हेवाट लावत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला.

समितीने याबाबत पिंपरी पोलिसांना निवेदन दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. प्रकरणाचे गांभीर्य ओळखत पोलिसांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.