Ravet : रावेत बंधाऱ्याचे ‘ड्रोन सर्वेक्षण’; साडेपाच लाख रुपयांचा खर्च

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन रावेत येथील जुन्या बंधा-याच्या खालील बाजूस नवीन बंधारा बांधण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने बंधा-याच्या वरील बाजूस पाणलोट क्षेत्राच्या धोक्याची पाण्याची पातळी तपासणे आवश्यक आहे. त्यासाठी ड्रोन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी साडेपाच लाख रूपये खर्च केला जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीसमोर ठेवला जाणार आहे.

पवना नदीवरील रावेत येथील बंधारा तात्कालीन लोकसंख्येनुसार पाणी वापर तसेच भविष्यात होणारी लोकसंख्या वाढ लक्षात घेऊन बांधण्यात आला होता. त्यानंतर शहरात निर्माण झालेल्या औद्योगिक क्षेत्रामुळे मागील काही दशकात महापालिका हद्दीत प्रचंड गतीने विकास होत आहे. लोकसंख्या वाढ कमी कालावधीत प्रमाणापेक्षा खूप जास्त असल्याचे दिसून येते. रावेत बंधा-याजवळ महापालिकेचे अशुद्ध जलउपसा केंद्र आहे. सद्यस्थितीत रावेत येथील बंधा-यातून महापालिका 480 एमएलडी, एमआयडीसी 120 एमएलडी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून 30 एमएलडी जलउपसा करते.

रावेत येथील बंधारा पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत आहे. या बंधा-याची देखभाल-दुरूस्तीची कामे पाटबंधारे विभागामार्फत करण्यात येतात. हा बंधारा जुन्या काळी बांधला असल्याने सद्यस्थितीत येथे पाणी साठवणूक क्षमता जलउपसाच्या अनुषंगाने कमी असल्याचे पाटंबधारे विभागाच्या अधिका-यांनी केलेल्या पाहणीत आढळून आले. त्याबाबत त्यांनी महापालिका अधिका-यांनाही सूचित केले आहे. सध्या पाणी उपसा पूर्ण क्षमतेने होत असल्याने बंधाऱ्यातील पाणी पातळी खाली जात आहे. त्याचा परिणाम पंपिंगवर होऊन पाण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.

यासंदर्भात महापालिका आयुक्त आणि पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्यात झालेल्या बैठकीत पाणलोट क्षेत्राचे सर्वेक्षण महापालिकेमार्फत करण्याचे ठरले आहे. या सर्वेक्षणात बंधा-याची उंची वाढविणे, खालील बाजूस नवीन बंधारा बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने बंधा-याच्या वरील बाजूस पाणलोट क्षेत्राच्या धोक्याची पाण्याची पातळी तपासणे आवश्यक आहे. हे काम तातडीने करणे आवश्यक असल्याने पाटबंधारे विभागामार्फत ड्रोन सर्वेक्षण करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.

निविदा न काढता सर्वात कमी दर सादर केलेल्या ठेकेदाराला काम देण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार पाच लाख 50 हजार रूपये हा लघुत्तम दर सादर करणा-या राहुल देशमुख यांना निविदा न मागविता करारनामा करून थेट पद्धतीने काम देण्यात येणार आहे. या कामासाठी सन 2018-19 च्या अंदाजपत्रकातील ‘पाणीपुरवठा विशेष योजना निधी’ या लेखाशिर्षाअंतर्गत ‘रावेत येथील जुन्या बंधा-याच्या खालील बाजूस नवीन बंधारा बांधणे’ या कामाअंतर्गत उपलब्ध तरतूद पाच लाख रूपये इतकी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.