Pimpri : मेधा पाटकर यांच्या मागण्यांना तत्काळ सकारात्मक प्रतिसाद द्या- मानव‌ कांबळे

एमपीसी न्यूज – राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी सुखरूप सोडण्यात यावे. त्यासाठी विनामूल्य प्रवासाची सोय करावी, या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर उपोषणाला बसलेल्या असून सरकारने त्यांच्या मागण्यांना तत्काळ सकारात्मक प्रतिसाद द्यावा, अशी विनंती मानव‌ कांबळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मानव‌ कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, कोरोनामुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व संकटाचा सामना आपले सरकार करत आहे. मात्र रोजगार उपलब्ध नसल्यामुळे कोरोनापेक्षाही महाभयंकर संकट देशातील गरीब-श्रमिकांवर कोसळले आहे. त्यामुळे आर्थिक संकटात बरोबरच अन्न, निवारा अशा मूलभूत गरजांही आवासून उभ्या आहेत.

नाईलाजास्तव महानगरांमधील हे असुरक्षित श्रमिक आपापल्या गावी परतण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीजण लपूनछपून, गुन्हेगारासारखे, त्यांना न परवडणारा दाम देऊन अनधिकृतपणे पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. हजारो किलोमीटर्स पायी प्रवास करत हे श्रमिक आपापल्या गावी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत.

अशा प्रवाशांना रसत्यात आडवले जात आहे व क्वारंटाईन केले जात आहे किंवा परत पाठवले जात आहे. त्यात कित्येकांचा मृत्यू होत आहे. हे देशासाठी व महाराष्ट्रासाठी लाजीरवाणे आहे. या मजूरांना परतण्याबाबत शासन सकारात्मक झाले असले तरी अद्याप त्याची व्यवस्था न झाल्यामुळे हे लोक चालतच आहेत. राज्या-राज्यांमध्ये समन्वय नसल्यामुळे राज्यांच्या सीमांवर अडकून पडत आहेत.

या लोकांना आपापल्या मूळ ठिकाणी जाण्यासाठी शासनाने तातडीने विनामूल्य व सुरक्षित व्यवस्था करावी आणि यासाठी दीर्घकाळ प्रयत्न केल्यानंतर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर या उपोषणाला बसल्या आहेत. त्यांच्या मागण्या योग्य असून तत्काळ प्रतिसाद देऊन योग्य अंमलबजावणी करावी अशी विनंती नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.